ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलिसांनी आपल्याच 18 महिन्याच्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी एका जोडप्याला अटक केली आहे. या चिमुरडीच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. दरम्यान जोडप्याने मुलीची हत्या नेमकी कशामुळे केली याचं कारण उघड झालेलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तपासादरम्यान पोलिसांना चिमुरडीचा मृतदेह मुस्लीम दफनभूमीत पुरल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी जमीन उकरुन मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात पाठवला. पोलीस सध्या रिपोर्टची वाट पाहत आहेत. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी जोडप्याला अटक कऱण्यात आली आहे. जाहीद शेख आणि नुरानी जाहीद शेख अशी त्यांची नावं आहेत. "दोघांना अटक करुन कोर्टात हजर करण्यात आलं. त्यांना 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे," अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पोलिस उपायुक्त आणि मानवी हक्क आयोगाला संतोष महादेव यांच्याकडून एक पत्र मिळालं. या पत्रात त्यांनी मुलाच्या गूढ मृत्यूची पोलीस चौकशी करण्याची मागणी केली होती. पत्रासोबत डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या मृत चिमुकल्याचे फोटो जोडण्यात आले होते. 


"या पत्रावर लिहिण्यात आलेला मोबाईल क्रमांक बंद होता. या पत्रात लिहिण्यात आलेला पत्ताही खोटा होता. पण यादरम्यान मुंब्रा पोलिसांनी हत्या झालेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी दफनभूमी आणि हॉस्पिटलमध्ये पाहणी सुरु केली होती," असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. 


यादरम्यान पोलिसांना 18 महिन्याच्या मुलीला मुंब्र्यातील दफनभूमीत दफन केल्याची माहिती मिळाली. या मुलीचं नाव लबिबा शेख होतं. 18 मार्च रोजी तिला दफन करण्यात आलं होतं. पोलिसांच्या हाती तिचं मृत्यू प्रमाणपत्रही लागलं. यावरुन पोलिसांना तिच्या पालकांनी डोक्यावर जखम झाल्यानंतर नेलेल्या डॉक्टराची माहिती मिळाली. 


एका हॉस्पिटमधील डॉक्टरांनी शेख दांपत्याला मुलीवर उपचार कऱण्यास नकार दिला होता. याचं कारण मुलीला जखम कशी झाले हे ते सांगू शकत नव्हते. त्यांचे दावे त्यांना पटत नव्हते. यादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, लबिबा दांपत्याची पाचवी मुलगी होती. याआधी त्यांच्या एका मुलीच्या डोक्याला अशीच जखम झाली होती. पण ती वाचली होती.


डॉक्टरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांचा संशय बळावला आआणि त्यांनी शेख दांपत्याला अटक करुन हत्येचा गुन्हा दाखल केला. गेल्या आठवड्यात पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्राथमिक तपासात तिच्या डोक्यावर धारदार शस्त्राने झालेल्या हल्ल्यामुळे मृत्यू झाल्याचं दिसत आहे. पोलीस आता हत्येचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.