पुण्यात बाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगी झोपेत असताना वडीलच तिच्यावर लैंगिक अत्यातार करत होते. यावेळी पत्नीने हा सर्व प्रकार पाहिला असता पतीने तिला मृत्यू होईपर्यंत मारहाण केली. लोणीनंद येथील आव्हाळवाडी येथे हा भयानक प्रकार घडला आहे. आरोपी पतीने पत्नीला अत्यंत निर्दयीपणे मारहाण केली. पतीने पत्नीला लाथा, बुक्क्यांनी मारहाण केली. तसंच तिचं डोकंही भिंतीवर आदळलं. यानंतर तो इतक्यावरच थांबला नाही. त्याने काठीच्या सहाय्याने पत्नीला आणखी जखमी केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस उपायुक्त (Zone IV) शशिकांत बोराटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या पत्नीवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचाही प्रयत्न केला. पण जेव्हा मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याचं लक्षात आलं तेव्हा तो थांबला. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला दोन लहान भाऊ आहेत. त्यांची वयं 15 आणि 13 आहेत. वडील आईला मारहाण करत असताना तिन्ही मुलांनी मध्यस्थी करत वाचवण्याचा प्रयत्न केला. पण आरोपीने त्यांना दुसऱ्या खोलीत बंद करुन ठेवलं होतं. नंतर त्याने त्यांना खोलीतून बाहेर काढलं. पण जे काही घडलं आहे, त्याची कुठेही वाच्यता करु नका अशी धमकीही दिली. 


पण मुलीने हिंमत दाखवत आपल्या मामाला हा सगळा धक्कादायक घटनाक्रम सांगितला. यानंतर मामाने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनीही लगेच कारवाई करत आरोपीला त्याच्या निवासस्थानाहून अटक केली. आरोपी हा शेतकरी आहे. 


मृतदेहाचं शवविच्छेदन केलं असता गंभीर जखमा झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी तपास केला असता आरोपीला दारुचं फार व्यसन असल्याचं समोर आलं आहे. पोलीस सध्या वैद्यकीय अहवालाची वाट पाहत आहेत असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत यांनी सांगितलं आहे. 


पोलिसांनी मुलीने जबाबात काय सांगितलं आहे याचीही माहिती दिली आहे. मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, वडिलांनी दारुच्या नशेत 28 ऑगस्टच्या रात्री तिच्याशी छेडछाड केली. 


बुधवारी रात्री हा सगळा प्रकार घडला. मुलगी झोपेत असताना आरोपी बाप हे कृत्य करत होता. यानंतर तिच्या आईने मध्यस्थी केली. पण यामुळे संतापलेल्या आरोपीने तिला बेदम मारहाण करत अखेर ठार केलं. 


पोलिसांनी आरोपीविरोधात हत्या, पुरावे नष्ट करणं, चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणं आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करणाऱ्या पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.