ठाण्यात अल्पवयीन मुलीचा छळ करण्यात आल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने 13 वर्षीय मुलीवर पाळत ठेवली होती, तसंच तिला मानसिक त्रासही दिला. इंस्टाग्रामच्या सहाय्याने आरोपीची मुलीशी ओळख पटली होती. यानंतर त्यांच्यात बोलणंही झालं होतं. पण यादरम्यान त्याचे हेतू वेगळेच होते. त्याने मुलीची भेट घेतल्यानंतर चुकीच्या पद्धतीने तिला स्पर्श केला होता. दरम्यान. मुलगी आपल्याला नकार देत असल्याने त्याने हाताची नस कापून घेत तिला जाळ्यात ओढण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून, पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीडित मुलगी वागळे इस्टेमध्ये वास्तव्यास आहे. काही महिन्यांपूर्वी मुलीने आपल्या आईच्या मोबाईलवरुन इंस्टाग्रामवर अकाऊंट सुरु केलं होतं. यादरम्यान तिने आरोपीने इंस्टाग्रामला पाठवलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारली होती अशी माहिती श्रीनगर पोलिसांनी एफआयआरच्या आधारे दिली आहे. 


मुलीने इंस्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारल्यानंतर त्यांच्यात बोलणं सुरु झालं होतं. मेसेजेस करत आरोपी आणि पीडित मुलगी एकमेकांशी गप्पा मारत होते. यादरम्यान, आरोपी सतत मुलीवर पाळत ठेवत होता. त्याने तर मुलीला तू जेव्हा 19 वर्षांची होशील तेव्हा मी तुझ्याशी लग्न करेन असं सांगितलं होतं. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भेट झाली असता आरोपीने मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता.


दरम्यान मुलगी आपल्याला टाळत असून, मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचं लक्षात आल्यानंतर आरोपीने ब्लेडच्या सहाय्याने हाताची नस कापून टाकली. इतकंच नाही तर त्याने मुलीला आपले न्यूड फोटोही पाठवले होते. आरोपी सतत छळ करत असल्याने मुलीला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. यामुळे मुलगी अनेकदा आजारीही पडली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 


यानंतर अखेर मुलीने पोलिसांत तक्रार करण्याचं ठरवलं. मुलीने रविवारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुलीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर दाखल केला. भारतीय दंड संहिता कलम 354D (पाळ ठेवणे) आणि 366A तसंच लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचं संरक्षण म्हणजेच पॉक्सो आणि कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.