Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच मुंबईच्या घाटकोपरमध्ये मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप करण्यात येतोय.. घाटकोपरच्या गुजरातीबहुल सोसायटीत संजय दिना पाटील यांची प्रचार पत्रक वाटायला कार्यकर्त्यांकडून मज्जाव झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातीबहुल सोसायटीत मराठी माणसाला बिल्डिंगमध्ये प्रचारासाठी येऊ देणार नाही अशी भाषा करण्यात आली, भाजप उमेदवार मिहिर कोटेचा यांची पॅम्प्लेट्स सोसायटीत वाटण्यात आली असा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.. दरम्यान मुंबईत मराठी माणसाविरोधात चाललेलं हे षडयंत्र आहे असा आरोप राऊतांनी केला.


तर, मोदी पुन्हा पंतप्रधान होणार असल्यानं ठाकरे गटाकडून रडीचा डाव सुरु असल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय. मराठी-गुजराती वादाच्या 2 घटना मुंबईत समोर आल्यात. विशेषत: लोकसभा निवडणूक ऐन रंगात असताना या घटना समोर आल्यात. मुंबईत मराठी माणसाचा मुद्दा राजकीयदृष्ट्या किती महत्त्वाचा आहे हे सगळ्यांनाच माहितीये. या दोन घटनांच्या निमित्तानं मराठी-गुजरात वादाला फोडणी मिळाल्याची चर्चा सुरु झालीय.


गुजराती-मराठी वादावरून संजय राऊतांची प्रतिक्रिया


गुजराती-मराठी वादावरून राऊतांनी प्रतिक्रिया दिलीय. मुंबईत मराठी माणसाविरोधात चाललेलं हे षडयंत्र आहे असा आरोप राऊतांनी केला. तर, शिंदे-फडणवीसांवर संजय राऊतांची जहरी टीका केली. बुळचट शिवसेना काय करतेय? असा सवाल करत राऊतांनी टीका केलीय. तर, मोदी पुन्हा पंतप्रधान होणार असल्याने ठाकरे गटाकडून रडीचा डाव सुरू असल्याचा टोला नितेश राणेंनी लगावला.


घाटकोपरमध्ये नेमकं काय घडलं?


निवडणुकीत घाटकोपरमध्ये मराठी-गुजराती वाद पुन्हा पेटला आहे. घाटकोपरमध्ये गुजराती बहुल सोसायटीत मविआचे उमेदवार संजय दिना पाटील यांचे पॅम्प्लेट्स वाटण्यास कार्यकर्त्यांना मज्जाव केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. गुजराती बहुल सोसायटीतील लोकांकडून मराठी माणसाला बिल्डिंगमध्ये प्रचार करायला देणार नाही अशी भाषा वापरण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. तर, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने मराठी-गुजराती वाद निर्माण करतायत असा आरोप भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी केलाय.


मराठी-गुजराती आदित्य ठाकरेंची आक्रमक प्रतिक्रिया 


भाजप सत्तेवर आल्यास महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यांना हीच वागणूक मिळेल, अशी संतप्त प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिलीय. गुजरातच्या एका जाहिरातीत ग्राफीक्स डिझायनरसाठी अर्ज मागवण्यात आले होते. मात्र त्या जाहिरातीत मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये असा उल्लेख करण्यात आला होता. तर गुजरातीबहुल सोसायटीत मविआच्या संजय दिना पाटलांच्या कार्यकर्त्यांना पत्रकं वाटायला मनाई केल्याचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे मराठी तरुणांना अशा पद्धतीची वागणूक देणं हे चुकीचं असल्याचं आदित्य म्हणाले.