428 वर्षाची परंपरा असलेली विदर्भातील पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना; 40 दिवसांचा पायी प्रवास
अमरावतीच्या पालखीला 428 वर्षाची पंरपरा आहे. चाळीस दिवस पायी वारी करत सगळे वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनाला पोहोचणार आहे.
Ashadhi Padharpur Wari 2023: पंढरपूरच्या वारीचे वेध आता वारक-यांना लागले आहेत (Ashadhi Padharpur Wari 2023). आषाढी वारीसाठी रुख्मिणीमातेच्या माहेरातून पालखी निघाली आहे. या पलखीला 428 वर्षाची परंपरा आहे. 40 दिवसांचा पायी प्रवास करत ही पालखी पंढरपुरात पोहचणार आहे.
428 वर्षाची परंपरा असलेली ही पालखी विदर्भातील मानाची पालखी समजली जाते. कोंडण्यपूर या रुक्मिणीच्या माहेरातून पालखी पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे. 40 दिवस पायी वारी करत हे सगळे वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे विठुरायाच्या चरणी लीन होणार आहेत. कोरोनाच्या काळात देखील ज्या दहा पालख्यांना पंढरपूर येथे प्रवेश देण्यात आला होता त्यामध्ये या पालखीला मान मिळाला होता. 428 वर्ष या पालखीला पूर्ण झाल्या असून 429 व्या वर्षात पदार्पण करत आहे. 22 मे रोजी ही पालखी रवाना झाली आहे.
पंढरपूर वारी पालखी मार्गावर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद सज्ज झालंय. उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी वारक-यांसाठी जास्त औषधं, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.. पुणे जिल्हाधिका-यांनीही पालखी मार्गावरच्या सुविधांचा आढावा घेतला. 10 जूनला तुकाराम महाराजांची, तर 11 जूनला माऊलींची पालखी प्रस्थान ठेवेल आहे.
आषाढी वारी काळात पंढरपुरात 5000 बसेस सोडणार
आषाढी वारी काळात पंढरपुरात 5000 बसेस सोडण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही घोषणा केलीय. मुख्यमंत्री आज वारीच्या नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. आषाढी यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा प्रदेशातून गाड्यांचं नियोजन करण्यात आलंय. वारकरी, भाविक तसंच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर इथं चंद्रभागा, भिमा, पांडुरंग आयटीआय कॉलेज आणि विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानकं उभारण्यात येणार आहेत.