सागर आव्हाड / पुणे : Jewellery worth 16 weights stolen from bank locker at Pune : बँकेत लॉकर दुरुस्तीसाठी आलेल्या व्यक्तीनेच लॉकर तोडून त्यामधील 16 तोळ्यांचे चोरुन नेल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. कॉसमॉस बँकेच्या धनकवडी शाखेतून दागिने चोरी गेल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमनाथ जयचंद मुळीक (21, रा. हडपसर, मूळ. रा. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका 66 वर्षीय महिलेने फिर्याद दिली होती. फिर्यादी महिलेने आपल्याकडील 16 तोळ्यांचे दागिने धनकवडीतील कॉसमॉस बँकेच्या शाखेत ठेवले होते. मात्र, लॉकर दुरुस्तीसाठी बँकेने त्यांना साहित्य घेऊन जाण्यास सांगितले. महिला साहित्य नेण्यासाठी बँकेत आल्यानंतर दागिने चोरी गेल्याचे तिच्या लक्षात आले. महिलने दिलेल्या फिर्यादीनंतर सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.


पोलिसांनी बँकेतील कर्मचाऱ्याकडे तपास केला असता 10 मे रोजी बँकेतील लॉकर दुरुस्तीसाठी आदित्य एंटरप्रायजेस या कंपनीचा एक कर्मचारी येऊन गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी लॉकर दुरुस्तीसाठी आलेल्या मुळीक याचा शोध घेऊन त्याला नवले पूल परिसरातून ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने दागिने चोरल्याची कबुली दिली.


बँकेत लॉकर दुरुस्ती करीत असताना तेथील कर्मचार्याची नजर चुकवून शेजारील लॉकर उघडून त्यातील दागिने चोरल्याचे मुळीकने कबूल केले. चोरलेले दागिने मुळीक याने त्याच्या मूळ गाव सातारा जिल्ह्यातील मुळीकवाडी येथील रानामध्ये ठेवले होते. पोलिसांनी त्याच्याकडून 4 लाख 80 हजार रुपये किमतीचे सर्व 16 तोळे दागिने जप्त केले आहेत.


वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) युनुस मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक निरीक्षक समीर शेंडे, कर्मचारी बापु खुटवड, महादेव नाळे, भुजंग इंगळे, सुशांत फरांदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.