योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : पालकांचे दुर्लक्ष मुलांच्या जीवावर बेतू शकते. गरम पाण्यात पडून तर कुठे बाल्कनीतून पडून लहान मुलांचा जीव जात आहे. अशाच प्रकारची धक्कादायक घटना नाशिकमध्ये (Nashik) घडली आहे. उकळत्या तेलाच्या कढईत पडून एका सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे (Shocking News).


काय आहे नेमकी घटना?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समाधान निंबा पवार हे त्यांच्या कुटुंबीयासोबत नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहराजवळील असलेल्या लखमापूर गावात राहतात. समाधान पवार यांचा खाद्य पदार्थाचा व्यवसाय आहे. 22 फेब्रुवारी रोजी ते व्यवसायाकरिता लागणारे खाद्य पदार्थ तयार करत होते. त्यांच्या घरात सायंकाळी शेव काढण्याचे काम सुरु होते. काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी भट्टी वरील कढई खाली ठेवली. या कढईत उकळते तेल होते. याच ठिकाणी त्यांची सहा वर्षाची मुलगी वैष्णवी खेळत होती. खेळता खेळता वैष्णवी कढई जवळ गेली आणि तिचा तोल गेला. जवळचा असलेल्या गरम तेलाच्या कढईत वैष्णवी पडली. तेल गरम असल्याने वैष्णवी भाजली होती. तिला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले.


चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू


वैष्णवीला लखमापूर येथील रुग्णालयात दाखल प्राथमिक उपचार करून नाशिकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, दहा दिवस मृत्यूशी झुंज देत तीन मार्चला वैष्णवीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने लखमापूर गावात शोककळा पसरली आहे.


साखरेच्या पाकात पडून चिमुकलीचा मृत्यू


30 एप्रिल 2018 ची रोजी देखील अशाच प्रकारची घटना घडली होती. शिरुडे कुटुंबीय नाशिकच्या हिरावाडी परिसरात वास्तव्यास आहे. त्यांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. त्यांच्या घरात केटरिंग साठी लागणारे गुलाबजाम तयार करण्याचे काम सुरु होते. गुलाबजाम करिता लागणारा साखरेचा पाक तयार करून ती कढई बाजूला ठेवण्यात आली होती. पाकाच्या कढई जवळ तीन वर्षाची चिमुकली खेळत होती. कढईत काय हे बघण्यासाठी गेलेल्या चिमुकलीचा अचानक तोल गेला आणि ती गरम पाकच्या कढई पडली. उपचाराकरिता तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला होता.


पालकांचे दुर्लक्ष मुलांच्या जीवावर बेततंय


लहान मुल खूप चपळ असतात. त्यांच्याकडे सारखे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, पालकांचे दुर्लक्ष झाल्याने मुलांच्या जीवावर बेततंय.  कॉईन, नेलकटर, मणी अशा छोट्या वस्तू गीळल्याच्या घटना घडल्या आहेत. यात पालकांचे दुर्लक्ष झाल्याने अशा घटना होत असल्याने या घटना झाल्या असल्याच डॉक्टरांनी म्हटले.