शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : यंदा १९ फेब्रुवारी शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे जवळपास सहा एकर शेतात अर्थात २ लाख ४० हजार चौरस मीटरमध्ये आळीवाच्या गवताच्या बियाची रोपण करून हरीत शिवप्रतिमा साकारण्यात आली होती. आता ४ महिन्यांनंतर याच हरित शिवप्रतिमेचा गुगल मॅपवरून एक व्हिडिओ बनविण्यात आला आहे. हा मॅप सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थेट गुगल मॅपवरून आपल्या राजाची प्रतिमा पाहताना प्रत्येक शिवभक्त भारावरून जात आहे. तब्बल दहा दिवस दहा कलाकारांनी अथक परिश्रम करून १५०० किलो अळीव गवताच्या बियाणांचा वापर करून शिवरायांची ही हरित कलाकृती सर्वाना पाहण्यासाठी खुली ठेवण्यात आली होती. त्यावेळेसही या हरित कलाकृतीचे ड्रोन शॉट्स सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. १९ फेब्रुवारी रोजी या ठिकाणी येणाऱ्या शिव भक्तांना ही हरित प्रतिकृती ड्रोन कॅमेऱ्याद्वारे पाहता यावी यासाठी चार स्क्रीनचीही व्यवस्था करण्यात आली होती. 



आता हीच कलाकृती भारताच्या नकाशावरून, गुगल मॅपवरून लातूर जिल्ह्याचा नकाशा दाखवून या व्हिडिओद्वारे व्हायरल होत आहे. निलंगा येथील नंदकिशोर नाईक या शेतकऱ्याच्या शेतात लातूरच्या कलाकारांनी ही विहंगम कलाकृती साकारली होती. सध्या या ठिकाणी मात्र काहीच नाही. मात्र गुगलवरील या व्हिडिओद्वारे शिवभक्तांमध्ये मात्र मोठा उत्साह दिसून येत असल्यामुळेच विविध सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. फेब्रुवारी महिन्यात साजरा झालेला हा शिवजन्मोत्सवाचा उत्सव गिनीज बुकात रेकॉर्ड व्हावा अशी अनेक शिवभक्तांची त्यावेळी इच्छा होती हे विशेष.