आशीष अम्बाडे, चंद्रपूर : गडचिरोलीमध्ये पोलिसांनी खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या एका टोळीला जेरबंद केलं. त्यांच्या चौकशीमध्ये प्रचंड धक्कादायक माहिती समोर आलीये. या खवल्या मांजराची विक्री जादुटोण्यासाठी होत असल्याचं समजलं असून ही टोळी मंत्रतंत्रासाठी प्राणीच नव्हे, तर माणसंही पुरवत असल्याचं उजेडात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गडचिरोली पोलिसांनी चामोर्शी इथं अत्यंत दुर्मिळ असलेल्या खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या एका टोळीला बेड्या ठोकल्या. या तीन आरोपींनी दिलेल्या माहितीवरून आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीमध्ये जादुटोणा करून पैशाचा पाऊस पाडण्यासाठी खवल्या मांजर आणल्याची धक्कादायक माहिती उजेडात आलीये. आरोपींपैकी एक जण मांत्रिकाच्या संपर्कात होता. या मांत्रिकानं पैशाचा पाऊस पाडण्यासाठी खवल्या मांजरावर मंत्रतंत्र करावे लागतील, असं सांगितलं होतं. त्यासाठी त्यानं या टोळीशी संपर्क साधला. 


एकूण दीड कोटींचा हा व्यवहार असल्याची माहिती आहे. ही टोळी मंत्रतंत्रासाठी तीळ नसलेली स्त्री, पायाळू व्यक्ती तसंच कासव, घुबड, साप असे प्राणी पुरवत असल्याचं समजलं असून जादूटोणा प्रतिबंधक कायद्याच्या अनुशंगानं प्रकरणाचा तपास होण्याची गरज व्यक्त होतेय. 


नागपूर जिल्ह्यातल्या एका आदिवासी व्यक्तीकडून टोळीनं हे खवल्या मांजर खरेदी केलं होतं. टोळीतल्या तिघांना अटक झाली असली तरी म्होरक्या मात्र फरार झालाय. आरोपींना १२ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आलीये. 


गुप्तधन, पैशांचा पाऊस असल्या भाकडकथांच्या मागे लागून अनेक जण कमी वेळेत श्रीमंत होण्याची स्वप्न बघतात. मांत्रिक-तांत्रिकांच्या नादी लागून फसतात... तीळ नसलेली स्त्री अन् खवल्या मांजराची पूजा करून असा फुकटचा पैसा मिळत नाही, याची सर्वांनी जाणीव ठेवली पाहिजे. शिवाय पोलिसांनीही अधिक सावधगिरीनं तपास करून या प्रकारांना आळा घातला पाहिजे.