मुंब्र्यात मराठी आणि हिंदी भाषिक वाद चव्हाट्यावर आला आहे. मराठी का येत नाही विचारणाऱ्या तरुणालाच माफी मागायला लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंब्र्यात फळविक्रेत्याला मराठी का येत नाही?  असं एका मराठी तरुणानं विचारलं आणि त्यावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर मराठी भाषिक तरुणावरच मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हिंदी येतं तर हिंदीत बोल, असं म्हणत तिथल्या जमावानं तरुणाला पोलीस स्टेशनमध्ये नेलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओत तरुणाला सर्वांनी घेराव घातलेला दिसत आहे. यावेळी पांढरा शर्ट घातलेला एक व्यक्ती मध्यस्थी करत काय झालं असं विचारतो. यावेळी तरुण मराठीत सांगू लागताच तो त्याला हिंदीत बोलायला सांगतो. तुला जर हिंदी समजतं तर तुला समजलं ना तो काय बोलतोय ते? अशी उलट विचारणा तो करतो. महाराष्ट्रात राहून त्याला 10 वर्षं झाली तरी मराठी येत नाही असं तरुण सांगत असताना, तो त्याल महाराष्ट्रात असो नाहीतर कुठेही असो येत नसेल मराठी तर काय करणार? अशी उलट विचारणा केली जाते. तसंच 100 नंबरला फोन करुन जमा करा असंही म्हटलं जातं. यादरम्यान तरुणाला शिवीगाळ आणि धमक्याही दिल्या जात असल्याचं व्हिडीओत ऐकू येत आहे. 


तरुण मराठीत माफी मागू लागताच सर्वजण त्याला अडवतात. "आम्हाला मराठी येत नाही, हिंदीत बोल," असं यावेळी मागे उभे तरुण ओरडत असल्याचं ऐकू येत आहे. यावेळी पांढरा शर्ट घातलेला व्यक्ती सर्वांना त्याची माफी व्हिडीओत रेकॉर्ड व्हावी यासाठी शांत राहण्याचं आवाहन करताना दिसत आहे. तसंच तरुण आरडाओरड सुरु असताना कसं बोलू असं हतबलपणे सांगताना दिसत आहे. 



नंतर तो हिंदीत माफी मागत म्हणतो की, "माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा". यावेळी लोक काय चूक झाली होती? अशी विचारणा करतात. यावेळी पांढरा शर्ट घातलेला तरुण, येथील लोकांना मराठी बोलण्याची जबरदस्ती केली असं सांगतो. यानंतर पुन्हा गर्दीचा गोंधळ सुरु होतो. 


नंतर तरुण सांगतो की, "मी मराठीत विचारलं की, हे कितीचं आहे. त्याने किंमत विचारल्यानंतर मी त्याला 10 रुपये जास्त होत आहेत असं म्हटलं. मी त्याला सांगितलं की 50 रुपये जास्त होत आहेत. त्यांचे दोन मित्र जेवायला बसले होते. त्यांनाही 50 रुपये घ्या असं म्हटलं. तो म्हणाला मला मराठी येत नाही. मी म्हटलं महाराष्ट्रात तुला किती वर्षं झाली, तुला मराठी येत नाही".


यादरम्यान काहीजण त्याच्यावर शिव्या दिल्या असा आरोप करतात. मात्र तरुण आपण कोणालाही शिव्या दिल्या नसल्याचं सांगतो. एक तरुण यावेळी त्याला मारहाण करण्याच्या उद्देशाने चेहरा पकडतो. यावेळी तरुणाला तू मुंब्रा बंद करणार अशी धमकी दिली का? अशीही विचारणा करतात. अखेर तरुणाने माफी मागितल्यानंतर सगळे शांत होतात. पण या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.