Abhishek Ghosalkar Murder Sanjay Raut Mentions 8000 Crore: शिवसेनेमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी सायंकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र असलेल्या अभिषेक यांच्यावर मॉरिस नारोन्हा ऊर्फ मॉरिस भाईने 5 गोळ्या झाडल्या. यानंतर मॉरिसनेही आत्महत्या केली. या हत्या प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदेवर हल्लाबोल केला आहे. हे सरकार गुंडगिरीला प्रोत्साहन देणारं असल्याचा आरोप करत संजय राऊतांनी आपण लवकरच 8 हजार कोटींसंदर्भात एक खुलासा करणार असल्याचं म्हटलं आहे.


बाळराजे म्हणत श्रीकांत शिंदेंचा उल्लेख


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी राज्यात भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावर सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारवर निशाणा साधला आहे. "गुंडांनी गुंडांसाठी चावलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी, मंत्रालयामध्ये, नागपूरच्या विधानभवानात अनेक गुंड, गुन्हेगार, माफीया अनेकदा मुख्यमंत्री आणि त्यांच्या बाळराजेंना भेटत होते, आजही भेटत आहेत," असं म्हणत श्रीकांत शिंदेवरही निशाणा साधला आहे. "मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचे, स्वागताचे बोर्ड ठाण्यापासून मुंबईपर्यंत कोण लावतंय? हे गुंड आणि माफियाचं लावत आहे. अनेक कंत्राटं, सरकारी कामं गुंडांना दिली जात आहेत," असं गंभीर आरोप राऊतांनी केला.


नक्की वाचा >> 'घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिसला CM शिंदेंनी दिलेली पक्ष प्रवेशाची ऑफर'; '4 दिवसांपूर्वीच..'


मुंबई, पुण्यातील 9 माफिया लाभार्थी


"8 हजार कोटींचं रुग्णवाहिकेचं कंत्राट हे कोणाला मिळतंय? मुख्यमंत्र्यांशी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या संबंधित कोणाला हे कंत्राट मिळालंय हे लवकरच समोर येईल," असं म्हणत राऊत यांनी लवकरच आपण मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा सूचक इशारा दिला आहे. "हे (कंत्राटी) काम देण्यासाठी बाळाराजेंकडून दबाव आला आहे किंवा येत आहे. या 8 हजार कोटींच्या कंत्राटामध्ये मुंबई, पुण्यातील 9 माफिया लाभार्थी आहेत," असंही राऊत म्हणालेत.



नक्की वाचा >> मृत्यूआधी आदित्य ठाकरेंना भेटलेले घोसाळकर! जाहीर सभेत आदित्य म्हणाले, 'आता 5 वाजता...'


पोलिसांनाही दिला इशारा


"सरकारी पैशांनी गुंडगिरी वाढवायची. सरकारी पैशांनी माफियांना बळ द्यायचं. पोलीस या गुंडांचे संरक्षक झाले आहेत. शिंदेंच्या टोळीत गुंड आणि पोलीस एकत्र आहेत. मुंबई-ठाण्यात अनेक ठिकाणी ज्या पोलिसांच्या नेमणुका केलेल्या आहेत हे सगळे शिंदे सेनेचे, शिंदे गँगचे सदस्य आहेत. त्यांचा हिशोब 2024 च्या निवडणुकांनंतर केला जाईल. त्यांची यादी तयार आहे हे मी आताच सांगतो. तुम्ही पोलिसांसारखे वागणार नसाल. तुम्ही एखाद्या सरकारी गुंड टोळीचे खाकी वर्दीतले मेंबर्स म्हणून वागणार असाल तर या राज्यातली जनता दुधखुळी नाही," असं म्हणत राऊत यांनी इशारा दिला आहे.