नागपूर - अमरावती राष्ट्रीय महामार्गावर अपघात; एकाचा मृत्यू तर एक जखमी
ट्रकचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे.
अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. तिवसा येथील पंचवटी चौकात उभ्या असलेल्या ट्रकला अमरावतीवरून नागपूरकडे जाणाऱ्या एम.एच 40 एके 1534 या क्रमांकाच्या ट्रकने मागून जबर धडक दिली. या धडकेमध्ये ट्रकमधील क्लिनर जागीच ठार झाला असून एक जण जखमी झालेला आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
याअपघातामध्ये ४९ वर्षीय सर्फराज महम्मद सैयद यांचा मृत्यू झाला आहे. तर फिरोज बब्बू काजी हे गंभीर जखमी झाले आहेत. वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे ट्रकचेही प्रचंड नुकसान झाले आहे.
नागपूरच्या दिशेने ट्रक क्रमांक एमएच-14, इएम -8881 हा जात असताना तिवसा नजीक या ट्रकच्या रेडीएटरच्या पाईपमध्ये बिघाड आल्याने तो नादुरुस्त अवस्थेत उभा होता. त्याच दरम्यान नागपूरच्या दिशेने भरधाव वेगात येणारा ट्रक नादुरुस्त ट्रकवर जोरदार धडकल्यामुळे अपघात झाला आहे.