Pune Accident: पुणे बंगळुरु महामार्गावर (Pune Bangalore Highway) भीषण अपघात झाला आहे. मुंबई-बंगळुरु महामार्गावर मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास नऱ्हे आंबेगाव परिसरात असणाऱ्या स्वामी नारायण मंदिराजवळ ट्रक व खाजगी बसचा भीषण अपघात होऊन चारजण ठार झाले आहेत. दरम्यान, या अपघातात 22 जण जखमी झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रकने खासगी ट्रॅव्हलच्या बसला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. बस साताऱ्याकडून मुंबईकडे जात होती. ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून अपघातात ट्रकचालकाचा देखील मृत्यू झाला आहे. अपघातानंतर पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमींना बाहेर काढलं. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत. 


नेमकं काय झालं?


मध्यराञी 2 वाजून 17 मिनिटांनी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात पुणे बंगळुरु हायवे, नरहे-आंबेगाव, स्वामी नारायण मंदिराच्या उतारावर एक मोठा मालवाहतूक करणारा ट्रक व खासगी बस यांचा अपघात झाला असून काही लोक अडकले आहेत अशी माहिती मिळाली. यानंतर अग्निशमन दलाकडून पुणे महानगरपालिकेची 4 अग्निशमन वाहने व 1 रेस्क्यु व्हॅन व पीएमआरडीए कडून 1 रेस्क्यु व्हॅन अशी एकुण 7 अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली. 


घटनास्थळी पोहोचताच गांभीर्य पाहून दलाचे अधिकारी व जवानांनी प्रथमत: बसच्या मागील बाजूची काच फोडून रश्शीचा वापर करत जखमी प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. तसंच पुढील बाजूस काही महिला व एक अंदाजे पंधरा वर्षाची मुलगी अडकली असता जवानांनी तिला अतिशय जिकरीचे प्रयत्न करीत जखमी अवस्थेत बाहेर काढले. अग्निशमन दलाकडून एकूण 22 जखमींना बाहेर काढले असून त्यांना जवळपास असणाऱ्या रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे. 


खासगी बस एमएच 03 सीपी 4409 निता ट्रॅव्हल्स कंपनीची असून कोल्हापूर ते डोंबिवली असा प्रवास करीत होती. तर ट्रमकधून साखरेची वाहतूक केली जात होती.