New National Education Policy : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेला डीएडचा (DEd) अभ्यासक्रम  कायमचं बंद होण्याची शक्यता आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार त्याऐवजी आता बारावीनंतर चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात शिक्षणशास्त्र विषय घेऊन शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांना बीएड (B.Ed) करावे लागणार आहेत. यासोबत त्यामध्ये स्पेशलायझेशन असणार आहे. केंद्राने नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (New National Education Policy) अंमलबजावणीला मान्यता दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सर्व अकृष विद्यापिठांमध्ये जून 2023-24 पासून नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या धोरणात बीएडबाबत नेमकी तरतूद काय?


* नव्या शैक्षणिक धोरणात डीएडचा अभ्यासक्रम नसणार


* पोस्ट ग्रॅच्युएट विद्यार्थ्यांना एका वर्षात बीएड करता येणार आहे


* पदवी घेतलेल्या उमेदवारांना दोन वर्षात बीएड पूर्म करता येणार आहे


* बारावीनंतर बीएडसाठी चार वर्षे लागणार आहेत


* यामध्ये कोणत्या विषयाचे शिक्षक व्हायचे याची निवड करता येणार आहे


डीएड बंद करणे योग्य नाही - शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख


"डीएड बंद करुन नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बीएड चार वर्षे करण्याच्या निर्णयाशी मी सहमत नाही. नव्या धोरणानुसार प्रकाशीत करण्यात आलेला आराखडा हा 5 + 3 + 3+ 4 असा आहे. या दृष्टीकोनातून विचार केला तर केजी आणि पहिली दुसरीसाठी त्यांनी स्वतंत्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम ठेवलेला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केला की तो शिक्षक या वर्गांना शिकवू शकतो. तिसरी, चौथी आणि पाचवीचा गट असून तो लहान आहे. त्यामुळे त्यासाठी बीएडचा उमेदवार ठेवणे मानसशास्त्राच्या दृष्टीकोनातून बरोबर नाही. त्याठिकाणी डीएड झालेले उमेदवारच हवे आहेत. तेच विद्यार्थ्यांसोबत योग्य संवाद साधू शकतील. तसेच विद्यार्थ्यांना शिकवण्याची प्रक्रिया बीएड आणि डीएडमधील वेगळी आहे," अशी प्रतिक्रिया शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांनी दिली आहे.


दरम्यान, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. "हा अभ्यासक्रम बंद करण्याबाबत काही माहिती नाही. मात्र सर्वच पदवी अभ्यास क्रम चार वर्षांचे होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या  महत्त्वाचा सर्वंकष विकास त्यातून घडणार आहे. तसेच अभ्यासक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर मिळणारे क्रेडिट पॉइंट्स विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत," असे चंद्रकांत पाटील म्हणाले.