Ajit Pawar Gulabi Jacket : उपमुख्यमंत्रीपदाची अजित पवारांची सध्याची ही पाचवी टर्म आहे. अजित पवार सर्वाधिक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. मात्र उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवारांना अनेक वेळा मुख्यमंत्री पदाने हुलकावणी दिली.  किती वेळ उपमुख्यमंत्री राहणार? मुख्यमंत्री केव्हा होणार? असा प्रश्न अजित पवारांना अनेकदा पडला. तसाच तो त्यांच्या कार्यकर्त्यांनाही पडलाय.. अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं हे त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचं आणि पदाधिका-यांचं स्वप्न आहे.. अजित पवारांचा 22 जुलै रोजी वाढदिवस  आणि त्याच निमित्ताने अजित पवारांसाठी कार्यकर्त्यांनी स्पेशल केक बनवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी अजित आशा अनंतराव पवार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की... हा मजकूर अजित पवारांसाठीच्या या केकमध्ये लिहिला होता. दादांनीही तो वाचला... केक ही कापला आणि थोडासा खाल्ला ही....  केकवरील मजकूर वाचून अजितदादांच्या चेह-यावरील स्मित हास्य देखील लपलं नाही.  त्यामुळेच अजित पवारांसाठी बनवलेल्या या केकची चर्चा संपूर्ण पुणे शहर आणि राज्यात आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवार भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर्सही याआधी लावले गेले आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेस अनेकवेळा राज्यात सत्तेत राहिली.. त्या प्रत्येक वेळी अजित पवारच उपमुख्यमंत्री राहिले.. अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची संधी असूनही त्यांना संधी देण्यात आली नाही असा दावा केला जातो. अजित पवारांनी काहीच वर्षांआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 40 आमदारांना सोबत घेत वेगळा सुभा मांडला.. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावरही दावा केला..  


आता विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने कात टाकलीय. गुलाबी रंग ही पक्षाची खास ओळख ठसवण्यात येणार आहे... कार्यक्रमांमध्ये सर्वत्र गुलाबी रंग प्राधान्याने वापरण्यात येतोय. अजित पवारांसाठीही सध्या गुलाबी कॅम्पेन राबवण्यात येतंय.. स्वतः अजित पवारांनी गुलाबी रंगाचं जॅकेट वापरण्यास सुरुवात केलीय... मात्र अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं हे कार्यकर्त्यांचं स्वप्न गुलाबी न राहता ते प्रत्यक्षात उतरावं यासाठी राष्ट्रवादीला तेवढ्या संख्याबळाचीही गरज लागणार आहे.