वेदांता- फॉक्सकॉन (Vedanta-Foxconn), बल्क ड्रग्ज पार्क (Bulk Drug Park) आणि मेडिसीन डिव्हाईस पार्क (Medical Device Park) पाठोपाठ आता नागपुरात होऊ घातलेला टाटा एअरबसचा (Tata Airbus Project) 22 हजार कोटींचा संरक्षण सामग्रीचा प्रकल्पही गुजरातला गेलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. यावरुन आता राज्यात राजकारण मोठ्या प्रमाणात तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यासाठी एकमेकांना दोषी ठरवत आहेत. यानंतर माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे देवेंद्र फडणवीसांचे नाव खराब होतय अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"वेदांता- फॉक्सकॉनसोबत जुनमध्ये सरकार पडण्यापर्यंत आम्ही संवाद साधत होतो. त्यानंतर जे असंवैधानिक सरकार आले त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की वेदांता- फॉक्सकॉन प्रकल्प येणार आहे. पण प्रकल्प निघून गेला. त्यानंतर बल्क ड्रग्ज पार्क आणि बल्क ड्रग्ज पार्क निघून गेला. वेदांता- फॉक्सकॉन गेल्यानंतर एअरबस प्रकल्प निघून जाईल असे आम्ही ओरडून सांगत होतो. तेव्हा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आम्ही 100 टक्के प्रकल्प आणू असे सांगितले होते. आम्ही काहीच नसेल केले तर तुम्ही तरी काही करायचे होते," असे आदित्य ठाकरे म्हणाले.


"कुठल्याही उद्योजकाला या सरकारवर विश्वास नाही. मी जर उपमुख्यमंत्री असतो जर तर या सरकारमधून पाठिंबा काढून घेतला असता. कारण या सर्व गोंधळामध्ये त्यांचे नाव खराब होत असून त्यांना यामध्ये खेचलं जात आहे. आपले असंवैधानिक मुख्यमंत्री कुठेही जात नाहीत. फक्त मंडळात फिरत आहेत. मुख्यमंत्री आताही सीएम मोडमध्ये नाहीत. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या जागी मी असतो तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवली असती कारण त्यांचेही नाव खराब होत आहे," असेही आदित्य ठाकरे म्हणाले.