कोरोनामुळे राज्यातील तीन महापालिकांवर प्रशासक नियुक्त होणार
कोरोनामुळे राज्यातील तीन महापालिकांवर प्रशासक नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कोरोनामुळे राज्यातील तीन महापालिकांवर प्रशासक नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यात औरंगाबाद, नवी मुंबई आणि वसई विरार महापालिकेचा समावेश आहे. या तीनही महानगरपालिकांची निवडणूक कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. त्यातच या महापालिकांची मुदतही संपत आहे.
औरंगाबाद महापालिकेची मुदत आजच २८ एप्रिलला, नवी मुंबई महापलिकेची मुदत ७ मे रोजी आणि वसई विरार महापालिकेची मुदत २८ जूनला संपत आहे. कोरोनामुळे या तीनही महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या संकटात या निवडणुका लवकर होणं शक्य नाही. त्यामुळे या तीनही महापालिकांवर प्रशासक नियुक्त करावा, असं पत्र राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिलं आहे.
कोरोनाच्या संकटात या महापालिकांना मुदतवाढ मिळेल अशी चर्चा होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाने निवडणूक आयोगाने या महापालिकांना मुदतवाढ न देता त्यांचच्यावर प्रशासक नियुक्त करण्याच्या सूचना राज्य सरकारला केल्या आहेत.
राज्यात भाजपचं सरकार असताना धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या महापालिकांना आरक्षणाच्या मुद्यावर मुदतवाढ देण्यात आली होती. याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने मुदतवाढ रद्द करताना या महापालिकांवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. याच आदेशाचा दाखल देत यावेळी कोरोनाचे संकट असले, तरी महापालिकांना मुदतवाढ न देता प्रशासक नियुक्त करण्याची भूमिका निवडणूक आयोगाने घेतली आहे. आता राज्य सरकारकडून प्रशासक नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू होतील.