HSC Exam 2023 Paper Leak :  बुलढाण्यात गणिताचा पेपर फुटल्याने खळबळ उडाली आहे.  या प्रकरणाची चौकशी सुरु असतानाच  आता मुंबईतही  बारावीचा गणिताचा पेपर  फुटल्याचं उघड झाल आहे (HSC Maths Paper Leaked). दादर मधील नामांकित कॉलेजमध्ये हा पेपर फुटीचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी शिक्षकासह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर, बुलढाण्यात शिक्षकांनीच पेपर व्हायरल केल्याचं उघड झाले आहे. या प्ररकरणी एकूण 7 जणांना अटक करण्यात आली आहे. बारावीच्या परीक्षेतील  (HSC Exam News )  पेपर फुटीच्या या प्रकारामुंळे शिक्षण विभागाच्या कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाल्या आहेत (HSC Board Exams ).


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या दादर येथील डॉ. अँटोनियो डिसिल्वा हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये गणिताचा पेपर फुटल्याचा प्रकार घडला आहे. विद्यार्थी परीक्षाकेंद्रात जाण्यासाठी 23 मिनिटं उरले असतानाच सकाळी 10.17 मिनिटांनी एका विद्यार्थ्याला व्हॉट्सअॅपवर गणिताचा पेपर आला. पोलिसांनी या संदर्भात चौघांवर गुन्हा दाखल केलाय. तीन विद्यार्थ्यांसह एका शिक्षकावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. विद्यार्थी परीक्षा केंद्रात परवानगी नसतानाही मोबाईल फोन घेऊन गेला. त्यांचा फोन तपासला असता त्यात गणिताचा पेपर आढळला.


गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता


बुलडाण्याच्या सिंदखेडराजामध्ये सकाळी 10.30 वाजल्यापासून गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 
बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.  साखरखेर्डा पोलिसांनी या प्रकरणी सात आरोपींना अटक केली असून यात दोन शिक्षकांचा समावेश आहे. त्यांच्यावर कलम 420 आणि 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.


दोन शिक्षकांसह आजुबाजुच्या गावातल्या 5 तरुणांचा यात समावेश आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातून  बारावीच्या गणिताचा पेपर फुटल्याने खळबळ उडाली होती. ही बातमी झी 24 तासने सर्वात आधी समोर आणली होती. मात्र, पेपर फुटी प्रकरणात अद्यापही मुख्य सूत्रधार पोलिसांना सापडला नाहीए.. पेपर लीक करणारं मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे. लोणार, बिबी अशा ठिकाणीही तपास यंत्रणेनं धाडी टाकून कारवाई केली.