पुणे : Eknath Shinde Udyan : पुण्यातल्या उद्यानाला माझं नाव कशाला दिलं, असे विचारत उद्यान वादावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी नगरसेवक नाना भानगिरे यांची कानउघडणी केली आहे. दरम्यान, आता शिंदे उद्यानाला आनंद दिघे यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात हडपसर भागातल्या वादग्रस्त उद्यानाला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव दिलं जाईल, अशी माहिती शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी दिली. संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच उद्यानाचे उदघाटन करणार होते. मात्र या उद्यानाच्या नावावरुन आणि प्रशासनाला माहिती नसण्यावरुन वाद पेटला होता. आता या उद्यानाला आनंद दिघे यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आलाय, असे ते म्हणाले. 


दरम्यान, हडपसर येथील उद्यान नामकरण सोहळा रद्द करण्यात आला आहे. प्रशासकीय मान्यता नसताना उदघाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार होते. मात्र,  हे नामकरण नियमबाह्य असल्याची तक्रार स्वयंसेवी संघटनांनी केली होती. याबाबत 'झी 24 तास'ने वृत्त प्रसारित केले होते. 'झी 24 तास'च्या बातमीनंतर हा सोहळा रद्द करण्यात आला आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुण्यात त्यांच्याच नावाने उभारण्यात आलेल्या उद्यानाचे उद्घाटन करणार होते. मात्र हे नामकरण नियमबाह्य असल्याची तक्रार स्वयंसेवी संघटनांनी केल्यामुळे हा उद्घाटन सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. हडपसर परिसरात महापालिकेच्या जागेवर हे उद्यान उभारण्यात आले आहे.