नाशिकमधील स्मार्ट रोडनंतर आता वॉटर फाउंटन प्रकल्पही अडचणीत
नाशिक शहरातील स्मार्ट सिटी अंतर्गत असलेला आणखी एक प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.
किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : नाशिक शहरातील स्मार्ट सिटी अंतर्गत असलेला आणखी एक प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. गोदाकाठावर सुरू असलेल्या वॉटर फाउंटन या प्रकल्पावर पालकमंत्री छगन भुजबळ आणि जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनीच आक्षेप घेतलाय. त्यामुळे भाजपच्या आणखी एका प्रकल्पाला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिक शहरातील स्मार्ट रोड नंतर आता वॉटर फाउंटन प्रकल्पही अडचणीत सापडलाय. नुकतीच गोदावरीचं प्रदुषण आणि बांधकामाबाबत जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांची गोदावरी साक्षरता मोहीम सुरू झालीय. ब्रम्हगिरी ते निफाड असा प्रवास असलेल्या या मोहिमेत पालकमंत्री छगन भुजबळही सहभागी झाले होते. पूररेषेचा मुद्दा आणि राज ठाकरे यांचा गोदा प्रोजेक्ट पुरात वाहून गेल्यानं वॉटर फाउंटनवर राजेंद्र सिंह आणि भुजबळांनी आक्षेप घेतला. यावेळी गोदावरी नदीची दूरवस्था आणि भ्रष्टाचारावर राजेंद्र सिंह यांनी बोट ठेवलं.
जलतज्ज्ञ, राजेंद्र सिंह यांनी, गोदावरी आजारी झाली असल्याचं सांगितलं. गोदावरी स्वच्छ झाली पाहिजे नाहीतर आपलं आरोग्य धोक्यात आहे. तिची जागा तिला द्या, त्यावर बांधकाम होता कामा नये. देशात नदीच्या नावावर केवळ पैसे खर्च होत असून, काम होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या बांधकामाला त्यांनी विरोध केला आहे.
छगन भुजबळ यांनीही गोदावरी प्रदूषणाबाबत महापालिकेच्या कामावर नाराजी व्यक्त करत, अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
दरम्यान, गोदावरी पाहणी दौऱ्यात महापालिका सत्ताधारी भाजपसह आयुक्त नसल्यानं भुजबळांनी बोलताना कोपरखळी मारली. तर भुजबळांनी स्मार्ट प्रकल्पावर आक्षेप घेतल्यानं या स्मार्ट प्रकल्पाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्मार्ट प्रकल्पावरून महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यात संघर्ष उभा राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.