अतिवृष्टीनंतरही मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरुच
अतिवृष्टीनंतरही कृत्रिम पावसाचा प्रयोग का?
विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : पावसाने दडी मारल्याने मराठवाड्यात दुष्काळ पडण्याची चिन्हं होती. त्यावर तोडगा म्हणून मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरु झाला. मात्र पावसाने धुमाकूळ घातल्यावरही हा प्रयोग सुरुच होता अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ४९ वेळा उड्डाण केल्यावर विमानं ८०८ प्लेअर्स बीजारोपण करण्यासाठी हवेत सोडण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडे आहे. ऑक्टोबरमध्ये मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला त्यावेळीही कृत्रिम पावसाचा प्रयोग का? याचं कोडं समजून घेण्यापलीकडे आहे.
ज्या भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला त्या भागात हा प्रयोग राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. हिंगोली जिल्ह्यात सरासरीच्या ८० टक्के पाऊस पडल्यामुळे त्याठिकाणी बीजारोपण करण्यात येईल अशी माहितीही प्रशासनाने दिलीय. मात्र त्यात पुढचे काही दिवस पावसाचे असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. मात्र त्यावेळीही हा प्रयोग सुरुच राहणार का? याचं उत्तर कुणीच देत नाहीये.
तीस कोटी रुपये खर्चून मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवण्यात येतोय. अतिवृष्टी झाल्यानंतर हा प्रयोग थांबवणं गरजेचं होतं. मात्र सुरू झाल्यापासूनच हा प्रयोग असाच अनागोंदी पद्धतीनं सुरु आहे. त्यात अतिवृष्टीतही प्रयोग सुरू असणं म्हणजे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा कळस आहे. असंच म्हणता येईल.