देवांचे दागिने चोरतंय कोण? तुळजाभवानीनंतर आता पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरातून दागिने गायब
पंढरपूरातील विठ्ठलाच्या 315 दागिन्यांची समितीकडे नोंदच नाही. लेखा परीक्षण अहवालातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मुल्यांकनाअभावी नोंद नाही अस स्पष्टीकरण मंदिर समितीने दिले आहे.
Pandharpur Vitthal Mandir : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील देवीचे दागिने गहाळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यानंतर आता पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरातूनही देवाचे दागिने गायब झाल्याचा धक्काकदायक प्रकार उघडकीस आला आहे. देवांचे दागिने चोरतयं कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीकडे काही दागिन्यांची नोंदच नसल्याचं समोर आले आहे. लेखा परीक्षण अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. 2021-22च्या अहवालात 315 दागिन्यांचा समितीकडे उल्लेख नसल्याची नोंद करण्यात आलीय. चांदीचा पान पुडा, पिकदाणी, चांदीची दांडी असलेला हात पंखा, कुंकवासाठीची लहान वाटी, सोन्याची नथ तसंच काही भाविकांनी देवाच्या मंदिरातील दरवाजे चांदीनं मढवले आहेत. अशा 315वस्तू आहेत. याची नोंद नसल्याचं लेखा परीक्षण अहवालात म्हंटलंय. तर दागिने गायब झाल्याचं वृत्त निराधार असल्याचं मंदिर समितीने म्हंटलंय. दागिन्यांचं मुल्यांकन न झाल्यानं त्यांची नोंद नसल्याचं स्पष्टीकरण मंदिर समितीच्या वतीने देण्यात आलंय.
तुळजाभवानीच्या दागिन्यांवर डल्ला मारणा-यांवर अखेर गुन्हे दाखल
तुळजाभवानीच्या दागिन्यांवर डल्ला मारणा-यांवर अखेर गुन्हे दाखल करण्यात आलेत. झी २४तासच्या बातमीनंतर ही कारवाई करण्यात आली. देवीच्या 27 अलंकारा पैकी 4 अलंकार गायब झालेत. यात पाऊण किलोहून अधिक वजनाचा सोन्याचा मुकूटाचाही समावेश आहे. या चोरीच्या घटनेचा झी २४तासनं सातत्यानं पाठपुरावा केला हाता. आमदार महादेव जानकर यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर प्रशासनानं या प्रकरणी पुजारी, सेवेकरी यांच्यासह तत्कालीन सहाय्यक व्यवस्थापक अंबादास भोसले यांच्यासह 6 जणांवर गुन्हे दाखल केलेत.
तुळजाभवानीच्या प्राचीन आणि मौल्यवान अलंकार गहाळ झाल्या प्रकरणात मंदिराचे व्यवस्थापक तहसीलदार सोमनाथ माळी यांनी 13 डिसेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, तत्काळ गुन्हा दाखल न करता प्रकरण चौकशीवर ठेवल्याचे सांगत चौकशीअंती निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मंदिर प्रशासनाचे कामकाज तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चालते, असे असतांना गुन्हा दाखल करण्यात आलेल्या यादीत कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याचे नाव नसल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय.