नाशिक : लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याच्या बाजार भावाने पुन्हा उसळी घेतली. सोमवारच्या तुलनेत एक हजार रुपयांची प्रती क्विंटलमागे आज वाढ होत ११ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. लाल कांद्याला ११ हजार १११ प्रति क्विंटलला इतका उच्चांकी बाजारभाव मिळालाय. तर १६ डिसेंबर रोजी लाल कांद्याला १० हजार ९९ रुपयांचा दर मिळाला होता. एकीकडे केंद्र सरकार ईजिप्त आणि तुर्की या देशातून २१ हजार मेट्रिक टन कांदा आयात करत आहे, तर दुसरीकडे व्यापाऱ्यांनी कांदा साठवणूक करू नये यासाठी त्यांच्यावर निर्बंध घातले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या पाच दशकांपासून कांद्याचा वांदा हा केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे होतोय. याचा फटका कधी शेतकऱ्यांना तर कधी सामान्य नागरिकांना बसत आहे. कांदा दिर्घकाळ टिकावा यासाठी लासलगावात २००२ साली भाभा अणुसंशोधन केंद्रानं कांद्यावर विकिरण प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारला गेला. 


विकिरण प्रक्रियेमुळे कांदे सडण्याची प्रक्रिया कमी होते. मात्र, खर्चिक पद्धतीमुळे शेतकऱ्यांनी या प्रकल्पाकडे पाठ फिरवली. त्यामुळे या केंद्रात आता कांद्याऐवजी हापूस आंब्यावर प्रक्रिया केली जाते. 


किरणोत्सर्गासाठी येणारा खर्च तसंच किरणोत्सर्गानंतर कांदे डोंगळयाला वापरता येत नसल्यानं शेतकऱ्यांनी या प्रकल्पाकडे पाठ फिरवलीय. कांद्याचा भाव स्थिर ठेवण्यासाठी केवळ हा एकच प्रकल्प नव्हे तर केंद्राचे इतरही अनेक निर्णय अपयशी ठरलेत.