अमरावती : अमरावतीमध्ये सोयाबिन पिकाचं नुकसान झालं आहे. महाविकासआघाडीतल्या दोन मंत्र्यांमध्ये यावरूनच कलगीतुरा रंगला आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कृषी खात्याच्या कारभारावर घणाघाती टीका केली आहे. तर या टीकेला उत्तर देताना कृषीमंत्री दादा भुसे यांची चांगलीच दमछाक झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातलं कृषी खातं झोपलं असल्याचा घरचा आहेर बच्चू कडू यांनी स्वत:च्याच सरकारला दिला. कृषीखात्याच्या कारभारावर बच्चू कडू चांगलेच संतापले आहेत. आधीच सोयाबिनचं बियाणं बोगस निघाल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. महाबीजने निकृष्ट दर्जाचं बियाणं चढ्या भावाने शेतकऱ्यांना विकलं. 


आता सोयाबिनवर अज्ञात रोगाने हल्ला चढवला. त्यामुळे शेतकरी पुरता बेजार झालाय. अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यात पिकांची पाहणी केल्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडूंचा पारा आणखीनच चढला. त्यांनी कृषी खात्याचा कारभाराचे वाभाडे काढले. महाबीजने बाजारातून बेकार बियाणं २-३ हजार रुपयांना खरेदी करून ते शेतकऱ्यांना ८ हजार रुपयांना विकल्याचा आरोपही बच्चू कडू यांनी केला. 


महाविकासआघाडीच्या राज्यमंत्र्याने सरकारविरोधात असा मोर्चा उघडल्याने कृषीमंत्री दादा भुसे यांनाही सारवासारव करावी लागली. बच्चू कडू यांना टीका करण्याचा अधिकार आहे, त्यांच्या सूचनांची तपासणी केली जाईल आणि त्यामध्ये जर कोणी दोषी असेल, तर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दादा भुसे यांनी दिली. 


महाविकासआघाडी सरकारमध्ये असा मंत्री विरुद्ध मंत्री सामना रंगला आहे. पण या मंथनातून शेतकऱ्यांचं भलं व्हावं एवढीच अपेक्षा.