मुंबई: कोरोनामुळे राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळातही कृषी विभागाच्या नियोजनामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊनचे निर्बंध असूनही राज्यभरात दररोज तब्बल २० हजार क्विंटल फळे आणि भाज्यांची विक्री होत आहे. यासाठी कृषी विभागाने मोठ्या शहरांमधील सोसायट्यांमध्ये थेट शेतमाल विक्रीची आणि ऑनलाईन विक्रीची व्यवस्था निर्माण केली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला लॉकडाऊनच्या काळातही मोठी बाजारपेठ उपलब्ध होत आहे. तर दुसरीकडे यामुळे सामान्य ग्राहकांचीही गैरसोय टळली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

...म्हणून सरकारने ऐनवेळी ई-कॉमर्स कंपन्यांना घरपोच डिलिव्हरीची परवानगी नाकारली

राज्यात टाळेबंदी लागू झाल्यानंतर नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेत किराणा दुकाने, भाजीपाला, औषधे यांची दुकाने सुरू ठेवण्यात आली. मात्र, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेला शेतमाल शहरी भागात पोहोचविण्यासाठी मोठे आव्हान होते.

कृषी उत्पन्न बाजार समित्या, आठवडे बाजार आदी प्रचलित मुल्य साखळीच्या माध्यमातून होणारा शेतमाल पुरवठा वाहतुकदार, हमाल यांच्या उपलब्धतेमुळे विस्कळीत झाला होता. या पार्श्वभूमीवर कृषि विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये स्थापन करण्यात आलेले शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, संस्था, आत्मा गट, स्वयंसहाय्यता गट, व्यक्तीगट उत्पादक यांच्या माध्मयातून थेट ग्राहकांपर्यंत स्थानिक प्रशासनाच्या मदतीने निश्चित केलेल्या ठिकाणी शेतमालाची विक्री तसेच ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून त्याची विक्री यासाठी कृषी विभागाने तयारी केली. 

ऑनलाईन विक्रीसाठी शेतकरी गट आणि उत्पादक संस्थांच्या प्रतिनीधीनींचे संपर्क क्रमांक, ईमेल आयडी आदी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. मालाची वाहतूक करणे सुरळीत व्हावे यासाठी शहरातील वॉर्ड हे ठरावीक संस्थांना जोडून देण्याचे काम केले. कांदे, बटाटे, टोमॅटो, वांगे यांची एकत्रित आकारमान निश्चित केलेली पिशवी तयार करून त्याची विक्री करण्यात येत आहे. कृषी विभागाने केलेल्या नियोजनामुळे दैनंदिन सुमारे २० हजार क्विंटल शेतमालाची विक्री होत  आहे.