जयेश जगड, अकोला : राज्यातील अनेक भागात दुष्काळाच्या झळा सुरू झाल्या आहेत. मात्र अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं आपला दुष्काळ कायमचा संपवला आहे. पाण्यानं भरलेले शेततळे. जिकडे पहावं तिकडे पाणीच पाणी. मनाला प्रसन्न करणारं हे चित्र आहे अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातलं. वर्षभरापूर्वी विमानतळ विस्तारीकरणात विद्यापीठाचा पाण्याचा स्त्रोत असणारं शरद सरोवर गेलं होतं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीकं आणि संशोधनं जगवायची कशी या विवंचणेत विद्यापीठ होतं. मात्र, सरकारचा एक निर्णय अन विद्यापीठानं झोकून देत विक्रमी वेळेत केलेल्या कामानं ही जलक्रांती अवतरली आहे. या कामांत विद्यापीठाचे तब्बल अडीच कोटी वाचले आहेत. तर सरकारचीही स्वामित्व धनापोटी द्यायची चार ते पाच कोटींची रक्कमही यातून वाचली आहे. 


२९ नोव्हेंबर २०१७ रोजी राज्याच्या म्रूद आणि जलसंधारण विभागानं एक अध्यादेश काढला. या अध्यादेशाचा आधार घेत विद्यापीठात जलसंधारणाचं आभाळभर काम उभं राहिलं. विशेष म्हणजे यासाठी विद्यापीठाला एक रूपयाही खर्च आला नाही. यातून विद्यापीठानं पाच नवी शेततळी खोदली. तर चार जून्या शेततळ्यांचं खोलीकरण केलं. आता यातून विद्यापीठानं तब्बल पाचशे हेक्टर क्षेत्र यावर्षी ओलीताखाली आणलं आहे.


या जलसाठ्यांमुळे विद्यापीठा लगतच्या शिवणी, शिवर, गुडधी, बाभूळगाव या गावांतील पाणी पातळीही मोठ्या प्रमाणात  वाढली आहे. असे प्रयोग इतर विद्यापीठांमध्येही झाल्यास राज्यातील विद्यापीठ पाण्याच्या दृष्टीनं स्वयंपूर्ण व्हायला वेळ लागणार नाही.