कुणाल जमदाडे, झी मीडिया, अहमदनगर : एकीकडे महाराष्ट्राच्या विकासाच्या (Maharashtra Development) गोष्टी केल्या जातात. सरकार कोणाचंही असो आपल्या काळात महाराष्ट्राचा कसा विकास झाला हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यातच संपूर्ण अधिवेशन संपून जातं. पण महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात अजूनही साध्या मुलभतू सुविधाही मिळालेल्या नाहीत.  सरकार बदलंय पण हे प्रश्न तसेच कायम आहेत, रस्ते, आरोग्य सुविधा, शैक्षणिक प्रश्न, पाणी या गरजाही भागलेल्या नाहीत. याचेच परिणाम खेड्यापाड्यातल्या नागरिकांना एकविसाव्या शतकातही सोसाव्या लागतायत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकमध्ये एका गरोदर महिलेला रस्ता नव्हता म्हणून रुग्णालयात चालत जावं लागलं, पण वाटेतच तिचा मृत्यू झाला ( Pregnant Women Death). राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित झाला होता. आता अशीच एक दुर्देवी आणि तितकीच संतापजनक घटना अहमदनगरमधल्या कोपरगावमध्ये (Kopargoan) समोर आली आहे.  प्राथमिक रूग्णालयात प्रसूतीसाठी गेलेल्या महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडलीय. तालुक्यातील चासनळी आरोग्यकेंद्रात डॉक्टरच उपलब्ध नव्हते. हे कमी की काय प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला दुसऱ्या रूग्णालयात नेण्यासाठी शासकीय रुग्णवाहिकेत डिझेल उपलब्ध नसल्याचं कारण देत रुग्णवाहिका चालकाने त्या महिलेला नेण्यास नकार दिला. 


या सर्वात बराच वेळ गेला आणि प्रसूतीसाठी आलेल्या 21 वर्षांच्या रेणूका गांगुर्डे या महिलेचा मृत्यू झाला. .दवाखाना आहे तर डॉक्टर नाही , रुग्णवाहिका आहे तर डिझेल नाही.  कोपरगाव तालुक्यातील आरोग्य केंद्राचा अजब कारभार चव्हाट्यावर आलाय. या रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा तिसरा प्रकार समोर येत असून ग्रामीण भागातील आरोग्यवस्था सक्षम व्हावी यासाठी राज्य शासनाने हजारो कोटी रुपयांची तरतूद केली. मात्र कोपरगाव तालुक्यातील आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसलेल्याने महिलेला आपला प्राण गमवावा लागलाय .रुग्णवाहिकेत डिझेल नव्हतं तर महिलेचा मृ्त्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह तिच्या कोपरगावपर्यंत कसा नेला, असा प्रश्न मृत मुलीच्या आई-वडिलांनी उपस्थित केला आहे. 


प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांवर आणि रुग्णवाहिका चालकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मृत मुलीच्या आई-वडिलांनी केली आहे. झी 24 तासने ही बातमी उघडकीस आल्यानंतर कोपरगाव तालुक्यातील चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.  जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन कारवाईचे संकेत दिले आहेत. 


काहि दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यातही रस्ता नसल्याने एका गरोदर महिलेचा मृत्यू झाला होता.