शरद पवारांआधीच आहिल्याबाईंच्या पुतळ्याचं पडळकरांकडून उद्घाटन, तर आव्हान देताना म्हणाले...
अहिल्यादेवी होळकर पुतळ्याच्या अनावरणावरून वाद होण्याची शक्यता
जेजुरी: जेजुरी गडावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उद्या पुतळ्याचं अनावरण होणार होतं. मात्र भाजप आमदारानं गनिमी कावा करत आज पहाटेच हे उद्घाटन केल्याचा दावा केल्यानं गोंधळ उडाला. या अनावरणावरून राजकीय वर्तुळात वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जेजुरी देवस्थानच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्यात आला होता. याचं अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते 13 फेब्रुवारीला करण्यात येणार होतं. त्यासाठी सगळी तयारी देखील पूर्ण झाली होती. याला भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी विरोध दर्शवला.
पहाटे भाजप आमदार पडळकर यांनी उद्घाटन केल्याचा दावा केला आणि एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी पडळकर यांना पुतळ्याजवळ जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचं अनावरण खंडेरायाच्या साक्षीनं धुमधडाक्यात झालं आहे असा दावा पडळकर यांनी केला. त्यामुळे शरद पवार यांनी पुन्हा उद्घाटन करू नये, असं पडळकर यांनी शरद पवारांना आव्हान दिलं आहे. तर आतषबाजी आणि धुमधडाक्यात युवा मित्रांच्या उपस्थितीत या पुतळ्याचं अनावरण केल्याचा दावा पडळकर यांनी केला आहे.