पतीच्या दुसऱ्या लग्नाचे कळताच पोहोचली लग्नमंडपात; नववूधला चोपत नेले पोलीस ठाण्यात
Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये पहिल्या पत्नीने पतीचे दुसरं लग्न उधळून लावल्याचा प्रकार समोर आला आहे. पतीच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळताच पहिली पत्नी नातेवाईकांसह लग्नमंडपात पोहोचली होती.
लैलेश बारगजे, झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmednagar Crime) पत्नी हयात असताना तिला घटस्फोट न देता दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाला पहिल्या पत्नीने चांगलाच धडा शिकवला आहे. लग्नाची घटका जवळ येत असतानाच पहिल्या पत्नीने लग्नामध्येच गोंधळ घालून पतीसह वराडींना भेट पोलीस ठाण्यामध्ये (Ahmednagar Police) खेचलं आहे. या सगळ्या प्रकारानंतर एकच गोंधळ उडाल्याने लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी आणि वऱ्हाडी मंडळींनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
जालना येथील विशाल पवार याचे लग्न बारा वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील मुलीसोबत झाला होता. आधी लग्न झालेलं असतानाही विशाल पवार हा अहमदनगर येथे दुसरा विवाह करत असल्याची माहिती पहिल्या पत्नीला मिळाली होती. त्यानंतर तिने आपल्या मुलासह आई-वडिल आणि नातेवाईकांना सोबत घेऊन नगर गाठले आणि ज्या मंगल कार्यालयात विशालचा दुसरा विवाह संपन्न होणार होता त्या ठिकाणी जाऊन गोंधळ घातला.
त्यानंतर पहिल्या पत्नीने तिच्या नवऱ्याच्या नियोजित वधूला चांगलेच चोपले. अचानक झालेल्या प्रकारामुळे नवीन वधू आणि दुसरं लग्न करणारा विशाल चांगलाच गोंधळून गेला. व्हराडी मंडळींना देखील काय झाले हे कळत नव्हतं. त्यानंतर लग्नमंडपातूनच कोणीतरी पोलिसांना फोन केल्यानंतर काही वेळाने पोलीस त्या ठिकाणी आले आणि सर्व वरात पोलीस ठाण्याला नेण्यात आली.
पोलीस ठाण्यात आल्यानंतर विशाल पवार याच्यावर त्याच्या पहिल्या पत्नीने गुन्हा दाखल केला आहे. विशालने कोणताही कायदेशीर घटस्फोट न घेता आणि एक मुलगा असताना दुसऱ्या मुलीबरोबर उपनिबंधक कार्यालयात विवाह करून एका हॉटेलमध्ये लग्न सोहळ्याचे आयोजन केल्याचा आरोप पहिल्या पत्नीने केला आहे. दरम्यान तोफखाना पोलिसांनी विशाल पवार यांच्याविरुद्ध भादवी 494 नुसार पुन्हा दाखल केला आहे.
"माझं लग्न 2011 मध्ये विशाल पवार या व्यक्तीसोबत झालं होतं. लग्नानंतर पती मला त्रास देत होता. अडीच वर्षांपूर्वी त्याने मला घरातून हकलवून दिले. त्यानंतर आम्हाला अचानक माहिती मिळाली की तो अहमदनगरमध्ये लग्न करत आहे. त्यानंतर आम्ही त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. मी दाखल केलेल्या तक्रारीनंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी," असे पहिल्या पत्नीने म्हटलं आहे.