कुणाल जमदाडे, झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar Crime) जिल्ह्यातील श्रीरामपूर आरटीओ (RTO) कार्यालयात एजंटंची दादागीरी पुन्हा एकदा समोर आली आहे. काम करून देत नाही म्हणून एजंटने थेट प्रादेशिक परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यावर खुनी हल्ला केला आहे. कार्यालयात घुसून या एजंटने कर्मचाऱ्यावर चॉपरने वार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी (Ahmednagar Police) याप्रकरणी मुख्य आरोपीस ताब्यात घेतलं पुढील तपास सुरु केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाला एजंटंचा विळखा पडला असून दिवसेंदिवस त्यांची दादागीरी समोर येताना दिसतेय. वाहनावरील बोजा कमी करून ट्रान्स्फर करून दे अशी मागणी करत आरटीओ कर्मचाऱ्यावर जमावाने खुनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार श्रीरामपूरमध्ये समोर आला आहे. गुरुवारी दुपारी हा सगळा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आलं आहे.


एजंटगिरी करणाऱ्या हुजेफ यूनुस जमादार याच्यासह 15 जणांनी कनिष्ठ लिपिक सुनील जगन्नाथ शेवरे यांना मारहाण करत चॉपरने जिवे मारण्याचा प्रयत्न केलाय. सुनिल शेवरे यांच्या फिर्यादीवरून, श्रीरामपूर पोलीस ठाण्यात भादवी कलम 353,332, 186,34, अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंध कायदा 3(1), (R)(S) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी हुजेफ यूनुस जमादार याला ताब्यात घेतले आहे. तर इतर आरोपींचा शोध सध्या श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत..


दरम्यान, काही दिवसांपूर्वीच महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आरटीओ कार्यालयाला एजंटाचा विळखा पडला असून विभागाची पुनर्रचना करण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. मात्र त्यांनतर देखील हा गंभीर प्रकार समोर आल्याने आरटीओचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कार्यालय परिसरात असणाऱ्या एजंटसोबत आर्थिक हितसंबंध आहेत असा सवाल उपस्थित केला जात आहे.


पोलिसांनी काय सांगितले?


"श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरटीओ कार्यालयात एजंट म्हणून काम करणाऱ्या हुजेफ यूनुस जमादार याने आणि त्याच्या भावाने बनावट कागदपत्रे तयार करुन कनिष्ठ लिपिक सुनील जगन्नाथ शेवरे यांना जबरदस्तीने सही करुन देण्यास सांगितले. शेवरे यांनी नकार दिल्यानंतर दोन्ही भावांनी दमदाटी केली आणि मारहाण केली. त्यामध्ये प्राणघातक शस्त्राचा देखील वापर केला आहे. हुजेबवर यापूर्वी देखील तीन गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत," अशी माहिती श्रीरामपुरचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी दिली.