पत्नीकडे घटस्फोट मागणार असाल तर आधी ही बातमी वाचा... कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निकाल
पती-पत्नींच्या संबंधांवर महत्त्वपूर्ण निकाल ठरतोय सध्या चर्चेचा विषय
लैलेश बारगजे, झी मीडिया, अहमदनगर : पती-पत्नीदरम्यान या ना त्या कारणावरुन भांडणं होत असतात. कधी ती घरातच मिटवली जातात, तर कधी ती कोर्टापर्यंत जातात. काही प्रकरणं सामोपचाराने मिटवली जातात. तर काही प्रकरणं घटस्फोटापर्यंत (Divorce) पोहोचतात. सध्या असंच एक प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. कोर्टाने या प्रकरणात पतीला दणका देत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
काय आहे कोर्टाचा निकाल?
पत्नीकडे घटस्फोटाची मागणी करणाऱ्या पतीने पत्नीकडे नांदण्यासाठी जावं असा महत्त्वपूर्ण निकाल अहमदनगर (Ahmednagar) इथल्या न्यायालयाने दिला आहे. अहमदनगर न्यायालयाचा पती-पत्नींच्या संबंधांवर महत्त्वपूर्ण निकाल सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या निकालात पतीने दोन महिन्याच्या आत पत्नीकडे नांदायला जावं अस आपल्या आदेशात म्हटल आहे.
या घटनेतील पती-पत्नी दोघेही उच्चशिक्षित असून दोघेही चांगल्या ठिकाणी नोकरीला आहेत. पती जिल्हा परिषद शिक्षक असून महिला कृषी विद्यापीठात नोकरीला आहे. दोघांचा विवाह ऑगस्ट 2014 मध्ये झाला. विवाहच्या दोन वर्षानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाले आणि दोघं वेगळं राहु लागले. यानंतर पतीने पत्नी परस्पर संमतीने हा वाद 2018 मध्ये न्यायालयात गेला. यात पतीने पत्नीकडे घटस्फोटाची मागणी केली.
या वादाचा निकाल अहमदनगरच्या वरिष्ठ दिवाणी न्यायालयाने दिला असून न्यायालयाने पती पत्नीने एकमेकांवर केलेले आरोप फेटाळून लावले. दोघे वैवाहिक संबंध पुर्नस्थापित होण्यास पात्र असल्याचं न्यायालयाने निकालात म्हटलं असून पतीने दोन महिन्याच्या आत वैवाहिक संबंध पुर्नस्थापित करावेत असा आदेश न्यायालयाने दिला आहे.