राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडून भाजपशी परस्पर युती; स्पष्टीकरण देण्याचे आदेश
सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेला अखेर सत्तेपासून वंचित रहावे लागले.
मुंबई: अहमदनगर महानगरपालिकेतील महापौरपदाची निवडणूक आता चांगलीच गाजण्याची शक्यता आहे. एकीकडे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीसाठी युती करून सर्वांनाच धक्का दिला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्थानिक नेत्यांनी परस्पर भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतल्याचा खळबळजनक खुलासा केला. पक्षाकडून भाजपशी युती करण्याचे कोणतेही आदेश दिले नव्हते. मात्र, काही नगरसेवकांनी परस्पर निर्णय घेत भाजपशी हातमिळवणी केली. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या सर्व नगरेसवकांना पक्ष नेतृत्वाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येणार आहे. तसेच भाजपला पाठिंबा देणे चुकीचे असून चौकशी करून संबंधितावर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे नगरमधील राजकारणाने रंजक वळण घेतले आहे.
अहमदनगरमध्ये श्रीपाद छिंदम यांनी शिवसेनेला मत दिलं आणि...
अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे १४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे १८ नगरसेवक निवडून आले होते. तर २४ जागा मिळवत शिवसेना सर्वाधिक मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे शिवसेना मतांची जुळवाजुळव करून पालिकेत आपला महापौर बसवेल, असा अंदाज होता. परंतु, तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपाच्या मदतीने महापौरपदाच्या निवडणुकीत बाजी मारली. महापौरपदी भाजपचे बाबासाहेब वाकळे तर उपमहापौरपदी भाजपच्याच मालन ढोणे प्रत्येकी ३७ मतांनी विजयी झाल्या. सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेला अखेर सत्तेपासून वंचित रहावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना आपल्या बाजूने वळवण्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. या निवडणुकीसाठी ते आज सकाळपासूनच अहमदनगरमध्ये ठाण मांडून बसले होते.
नगरमध्ये भाजपकडून शिवसेनेला धोबीपछाड; राष्ट्रवादीशी युती करत महापौरपदावर कब्जा