अहमदनगर : शुक्रवारी अहमदनगरच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीवेळी एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं... अपक्ष म्हणून निवडून आलेल्या एका उमेदवारानं आपलं मत शिवसेनेला दिलं म्हणून शिवसैनिकच त्याच्या अंगावर धावून गेल्याचं चित्र महापालिकेत दिसलं. हा नगरसेवक होता गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेला श्रीपाद छिंदम...
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या छिंदमला भाजपनं महापौर पदावरून पदच्युत केलंच होतं शिवाय पक्षातूनही बडतर्फ केलं होतं. वर्षभरापूर्वी उपमहापौर पद गमावल्यानंतर आणि भाजपमधून बाहेर पडल्यानंतर अपक्ष नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आले आहेत. यावेळी, श्रीपाद छिंदम यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं निवडणुकीच्या वेळी एकच गोंधळ उडला. 'शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्याकडून आम्हाला मत नको' असं सांगत शिवसैनिकांनी एकच गोंधळ घातला.
इतकंच नाही तर, शिवसैनिक छिंदम यांच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक निवडणूक प्रक्रियेतून निघून गेले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, या निवडणुकीसाठी आधीच छिंदम यांनी पोलिसांकडून संरक्षणही मागून घेतलं होतं.
शिवसेनेकडे २४ नगरसेवक असूनही अहमदनगरमध्ये भाजपाचे बाबासाहेब वाकळेच नवे महापौर होण्याचा मार्ग मोकळा झालाय. भाजपानं राष्ट्रवादीची साथ घेऊन नगरपालिकेत आपला महापौर बसवला आहे. भाजापचे १४ आणि राष्ट्रवादीचे १८ असे मिळून ३२ नगरसेवक आहेत. बसपानंही राष्ट्रवादीच्या संपत बसस्कर यांनी अर्ज मागे घेतलाय. आणि भाजपाचे उमेदवार बाबासाहेब वाकळे यांना पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे आता महापौरपदी वाकळेच बसणार हे निश्चित झालंय. दरम्यान, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा थेट आरोप 'झी २४ तास'शी बोलताना केलाय.
शिवसेना - २४
भाजप - १४
राष्ट्रवादी काँग्रेस - १८
काँग्रेस - ०५
इतर - ०७