हळदीच्या सोहळ्यात गेले अन् आजारी पडले! अहमदनगरमध्ये तब्बल 200 जणांना विषबाधा
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये तब्बल 200 जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोले तालुक्यातील एका गावात हळदीचा कार्यक्रम होता. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला.
कुणाल जमदाडे, झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगरमध्ये 200 जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हळदीच्या कार्यक्रमातून ही विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. जुलाब आणि उलटीचा त्रास होऊ लागल्याने अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय. काही दिवसांपासून पूर्वीच नांदेडमध्ये एक हजार लोकांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.
अकोले तालुक्यातील मवेशी करवंदरा येथे हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. नवरदेवाच्या घरी हा हळदीचा कार्यक्रम होता. हळदीच्या कार्यक्रमानंतर जेवण ठेवण्यात आलं होतं. मात्र या जेवणातून तब्बल 200 जणांना विषबाधा झाली. यातील अनेकांना जुलाब आणि उलटीचा त्रास जाणवल्याने रुग्णालयात हलवण्यात आलं. तर 59 लोकांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात तर काहींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. विषबाधा झालेल्यांमध्ये सात बालकांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार वैभवराव पिचड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पिचड यांनी रुग्णांना मदत करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
नांदेडमध्ये दोन हजार जणांना विषबाधा
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये तब्बल दोन हजार लोकांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती. नांदेडच्या लोहा तालुक्यातील कोष्टवाडी येथे पालखी सोहळ्यानिमित्ताने भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाप्रसाद घेतलेल्या भाविकांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. महाप्रसादामध्ये भगर खाल्याने मध्यरात्री दोन वाजल्यापासून हजारो लोकांना उलटी, डोके दुखी, चक्कर येणे असा त्रास सुरु झाला होता. त्यानंतर रात्री दोन वाजल्यापासून रुग्णांना लोहा शहरात शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
अकोल्यात 10 विद्यार्थ्यांना विषबाधा
अकोल्यात मनपाच्या शाळेत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. पोषण आहाराच्या खिचडीत मेलेल्या उंदराचे अवशेष सापडल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. खिचडी खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शाळेतील 10 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.