अजितदादांचा पुण्याच्या पालकमंत्रिपदावर दावा कायम, राष्ट्रवादी-भाजपात जुंपली
Pune Ajit Pawar: राष्ट्रवादी मात्र पुण्याच्या पालकमंत्रिपदावरुन दावा सोडायला तयार नाही. पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडंच असावं अशी थेट भूमिका राष्ट्रवादीनं घेतलीय.
Pune Ajit Pawar: पुण्याचा पालकमंत्री कोण होणार यावरुन राष्ट्रवादी आणि भाजपात संघर्ष सुरु झालाय. यावेळी भाजपला पुण्याचं पालकमंत्री मिळायलाच हवं अशी भूमिका पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी घेतलीय. चंद्रकांत पाटील यांनीही पालकमंत्री मिळाल्यास ते स्वीकारण्यास तयार असल्याचं सांगितलंय. राष्ट्रवादीनं मात्र पालकमंत्रिपदावर दावा कायम ठेवलाय.
महायुतीत राष्ट्रवादी आणि भाजप हे सख्खे दोस्त आहेत. पण पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा विषय निघताच भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोस्तीत कुस्ती सुरु झालीय. गेल्यावेळी अजित पवार सरकारमध्ये सामील होताच त्यांनी पुण्याचं पालकमंत्रिपद स्वतःकडं घेतलं. तर चंद्रकांतदादांना पालकमंत्रिपदावर पाणी सोडावं लागलं होतं. आता यावेळी मात्र पुण्याचं पालकमंत्रिपद भाजपलाच हवं असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. पालकमंत्रिपदावर चंद्रकांत पाटलांनी थेट दावा केला नसला तरी पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारु असं अप्रत्यक्षपणं सांगितलं.
राष्ट्रवादी मात्र पुण्याच्या पालकमंत्रिपदावरुन दावा सोडायला तयार नाही. पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडंच असावं अशी थेट भूमिका राष्ट्रवादीनं घेतलीय.
मागच्यावेळी पालकमंत्रिपदाची अजितदादांची इच्छा भाजपनं पूर्ण केलीय. यावेळी भाजप आपल्या पक्षातील दादांची ईच्छा पूर्ण करतील का याबाबत उत्सुकता निर्माण झालीय. सध्या फडणवीस आणि अजितदादांची मैत्री पाहता ही शक्यता कमीच वाटू लागल्याची चर्चा सुरु झालीय.
महायुतीचा शपथविधी झाला खातेवाटप कधी?
महायुती सरकारतचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी शपथ घेतली. साधारण शपथ घेतल्यानंतर पुढच्या तासादोनतासांत मंत्र्यांकडं खाती दिली जातात. पण 24 तास उलटल्यानंतरही मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालेलं नाही. सध्या सगळी खाती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडंच आहेत. सरकार एका पक्षाचं नाही त्यामुळं खातेवाटपात उशीर होत असल्याचा दावा राष्ट्रवादीनं केलाय.शिवसेनेनं सन्मानजनक खाती मिळावीत अशी मागणी केलीय.मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रक्रियेत आपण नसल्याचं सांगत मला कळलं की तुम्हाला कळवतो असं मोघम उत्तर चंद्रकांत पाटलांनी दिलंय.सुरुवातीला शपथ घेतलेल्या तिघांमध्ये खातेवाटप होईल अशी अपेक्षा होती. पण खातेवाटप जाहीर झालेलं नसल्यानं खात्यांची रस्सीखेच अजूनही सुरु असल्याची चर्चा सुरु झालीय.