Ajit Pawar On Loksabha Result: उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. आनंद, दुख, राग, माफी जे मनात येईल ते मनमोकळेपणाने बोलतात. नुकतेच एका भाषणादरम्यान अजित पवारांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. लोकसभेसारखा दणका देऊ नका रे बाबांनो, लय वंगाळ (वाईट) वाटतंय, असे अजित पवार म्हणाले. पुण्यातील मंचर येथील भाषणात ते बोलत होते. 


लोकसभेसारखा दणका आगामी विधानसभेत देऊ नका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेंबीच्या देठापासून अगदी घाम निघेपर्यंत ओरडून सांगतोय पण समोरच्यांनी देवळात वाजवायची घंटा माझ्या हाती दिली, अशी खंत वजा साद उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मतदारांना घातली. जनसन्मान यात्रेदरम्यान पुण्यातील आंबेगाव विधानसभेत बोलताना झालेल्या चुकांची मी माफी मागितली आहे. आता तुमच्या कांदा, टोमॅटो वर कधीचं निर्यात बंदी आणणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींना तसं आवर्जून सांगितलं आहे. उसाला ही चांगला दर देतोय. माझं काम बोलतं काम अन आपलं कामचं भारी असतं. फक्त लोकसभेसारखा दणका आगामी विधानसभेत देऊ नका, अशी साद अजित पवारांनी मतदारांना घातली आहे.


सरडा, ढेकूण म्हणून राज्याचा कायापालट होणार आहे का? 


सरडा आणि ढेकूण म्हणून राज्याचा कायापालट होणार आहे का? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना विचारला आहे. अजित पवारांनी गुलाबी रंगाला आपलंसं केलं. यावरून सरडा ही रंग बदलतो अशी खोचक टीका शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी केली होती. त्याला उत्तर देताना अजित पवारांनी हा सवाल उपस्थित केला. कोण आम्हाला शिव्या देतंय, कोण आम्हाला शाप देतंय तर कोण कोणाला सरडा म्हणतंय अन कोण कोणाला ढेकूण म्हणतंय. पण यामुळं राज्याचे प्रश्न सुटणार आहेत का? राज्याचा कायापालट होणार आहे का? याचं उत्तर विरोधकांनी द्यावं, असं आवाहन अजित पवारांनी केलं. जनसन्मान यात्रेदरम्यान पुण्यातील आंबेगाव विधानसभेत अजित पवारांनी विरोधकांवर असा निशाणा साधला.


चूक मान्य 


जुलै 2023 मध्ये अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली. यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ चर्चेत राहिला. कारण येथे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत पाहायला मिळाली. पवारांच्या घरातील एक मुलगी आणि एक सून एकमेकींच्या विरोधात उभ्या राहिल्या. यात सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी नको द्यायला हवी होती, असे देखील अजित पवारांनी बोलून दाखवले. ती आपली चूक झाल्याचे ते म्हणाले. सगळ्याच माझ्या लाडक्या बहिणी आहेत आणि राजकारण घरात शिरु द्यायचं नसतं असंही वक्तव्य केलं आहे.