केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) भ्रष्ट्राचाऱ्यांचे सरदार म्हटलं असल्याने राजकारण तापलं आहे. त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत असून अजित पवार गटाचे (Ajit Pawar Faction) विलास लांडे (Vilas Lande) यांनी आक्षेप घेतला आहे. शरद पवारांवर टीका करण्याची चूक करु नका असं विलास लांडे म्हणाले आहेत. तसंच शरद पवारांवरील टीकेमुळे विधानसभेतही फटका बसू शकतो असा इशाराच त्यांनी 'झी 24 तास'शी बोलताना दिला आहे. विलास लांडे यांनी यासंबंधी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्रच लिहिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात भाजपाच्या दोन दिवस राज्य कार्यकारिणीचे आयोजन करण्यात आले होते. याचा समारोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झाला. समारोपावेळी संबोधित करताना अमित शाह यांनी शरद पवारावर जोरदार टीका केली. भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोणी असतील तर ते शरद पवार आहेत. भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम शरद पवार यांनी केलं आहे, असं अमित शाह म्हणाले आहेत. त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत असून अजित पवार गटाचे (Ajit Pawar Faction) विलास लांडे (Vilas Lande) यांनी आक्षेप घेतला आहे.


काय म्हणाले विलास लांडे?


"त्यांनी असं बोलणं योग्य नाही. आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाईट वाटतं. कारण आम्ही शरद पवारांना जवळून पाहिलं असून, देवघरात देवासारखी त्यांची पूजा करतो. जर कोणी असं विधान करत असेल तर त्यात सुधारणा करावी. जेणेकरुन येणाऱ्या विधानसभेत त्याचा फटका बसू नये," असं विलास लांडे म्हणाले आहेत.


अण्णा बनसोडे यांनीही व्यक्त केली नाराजी


भाजपाने केलेली टीका योग्य नसल्याचं मत अजित पवारांचे कट्टर समर्थक विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केलं आहे. "शरद पवार हे देशाचे नेते आहेत. ते भाजपानेही कबुल केलं आहे. भाजपाने शरद पवारांचा आदरच केला पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील शरद पवार हे माझे गुरू आहेत, असं म्हटलं होतं. यावरून भाजपा नेते अमित शहा यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, ते योग्य नाही,” असं ते म्हणाले आहेत. 


तसंच बच्चू कडू यांनी तर शरद पवार जर भ्रष्टाचाराचे सरदार असतील तर मग लोक विचारणार की अजित पवार कोण आहेत? सरदारांचे पुतणे आहेत की कोण आहेत? अशी विचारणा केली आहे. अमित शाह विसरभोळे झाले असावेत. अमित शाह असं वादग्रस्त वक्तव्य करतात आणि त्यांच्या अंगलट येतं असंही ते म्हणाले.