Ajit Pawar Joined Shinde Government Slammed For Nagaland Comment: राज्यामध्ये सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागालँडचा संदर्भ दिला. नागालँडमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी एकत्र येऊ शकते तर महाराष्ट्रात का नाही असं म्हणत अजित पवार यांनी आपल्या भूमिकेचं समर्थन पत्रकार परिषदेत केलं. मात्र आता याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. अजित पवारांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय हा शरद पवारांचं नेतृत्व संपवण्यासाठी भाजपाने आखलेला डाव असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. तसेच राऊत यांनी नागालँडचा संदर्भ देणाऱ्या अजित पवारांनाही त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.


हे देशाला आणि महाराष्ट्राला परवडणारं नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला केला. तसेच याच मुद्द्यावरुन त्यांनी अजित पवारांनाही टोला लगावला. "कालपर्यंत शरद पवारही कोणाचे तरी गुरु होते. पण गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर गुरुला दगा देण्यात आला. महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही काळापासून दगाजाबीचं राजकारण सुरु झालं आहे," असं संजय राऊत म्हणाले. तसेच पुढे बोलताना, "महाराष्ट्राच्या राजकारणातून, समाजकारणातून आणि इतिहासातून माननीय बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार या टोलेगंज नेतृत्वाचं कार्य, संघर्ष आणि इतिहास कायमचा पुसून टाकला जावा म्हणून हे घाणेरडं राजकारण सुरु आहे. शिवसेना संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. तो यशस्वी होणार नाही. शरद पवारांचं नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. शरद पवार आज कराडला बाहेर पडले आहेत. यशवंतराव चव्हाणांचं नाव पुसण्याचा, संस्कृती पुसण्याचा प्रयत्न सुरु आहे. काही करुन महाराष्ट्रात गद्दारीचा, बेईमानीचा नवा इतिहास लिहिला जावा. नवीन पात्र राजकारणात निर्माण करण्यासाठी जे प्रयत्न सुरु आहेत तो लोकशाही, देशाला आणि महाराष्ट्राला परवडणारं नाही," असं संजय राऊत म्हणाले.


नागालँडवरुन टोला


अजित पवारांनी नागालँडचा संदर्भ देत आपल्या निर्णयाचं समर्थन केल्याचा उल्लेख करत पत्रकाराने संजय राऊत यांना प्रश्न विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत यांनी, "नागालँडची परिस्थिती वेगळी आहे. अजित पवार नागालँडला जाऊन उपमुख्यमंत्री झालेले नाहीत. महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. नागालँड हे सिमावर्ती राजकारण आहे. नागालँडमध्ये असे प्रयोग होत असतात. नागालँड, मिझोरममधील परिस्थितीशी कोणी महाराष्ट्रातील तुलना करत असेल तर त्याला महाराष्ट्रातील राजकारणाचा, संस्कृतीचा अभ्यास करावा लागेल. हा महाराष्ट्र आहे हे ते विसरत आहेत," असं म्हटलं.