Maharashtra Politics : मग काम कुठं मागायचं? `त्या` विधानावर राज ठाकरे यांना अजित पवार यांचा सवाल
Raj Thackeray : शेजारच्या गुजरात, मध्य प्रदेशात महाराष्ट्रातील प्रस्तावित प्रकल्प गेल्याने राज्यातील शिंदे - फडणवीस सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही याबाबत भाष्य केले आहे
Maharashtra Politics : राज्याबाहेर एकामागून एक जाणाऱ्या उद्योगांवरुन शिंदे - फडणवीस सरकारवर (Shinde - Fadnavis Government) महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. राज्यातील प्रस्तावित उद्योग गेल्या वर्षात सलग शेजारच्या गुजरात (Gujarat) आणि मध्य प्रदेश राज्यात गेले आहेत. यावरुन मोठं राजकारणी रंगलं होतं. 'वेदांत-फॉक्सकॉन' सारखे पाच प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले होते. याबाबत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रविवारी एक वक्तव्य केले. यावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
पिंपरीत सुरु असलेल्या 18 व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनात राज ठाकरे बोलत होते. यावेळी मुलाखतीदरम्यान त्यांना राज्याबाहेर गेलेल्या उद्योगांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर राज ठाकरे यांनी ज्यातून एक-दोन उद्योग बाहेर गेल्यानं काहीही नुकसान होणार नाही, असे म्हटले. राज ठाकरे यांच्या या विधानावरुन आता प्रतिक्रिया समोर येत आहेत.
काय म्हणाले राज ठाकरे?
"महाराष्ट्र हा सर्वार्थाने श्रीमंत आहे. महाराष्ट्राचं काय होणार? असा टाहो आपण उगाच फोडत असतो. आपल्याकडे जे आहे, ते जरी टिकवलं तरी महाराष्ट्र सर्वांच्या पुढे आहे. राज्यातून एक-दोन उद्योग बाहेर गेल्याने महाराष्ट्राचं काहीही नुकसान होणार नाही. मात्र, आपण महाराष्ट्र जोपासणं गरजेचं आहे. प्रत्येकाने या गोष्टीकडे नीट बघणं आवश्यक आहे," असे राज ठाकरे यांनी म्हटले.
अजित पवार यांचे प्रत्युत्तर
राज ठाकरे यांनी केलेल्या विधानावर अजित पवार यांनी भाष्य केले आहे. "महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर जाणं, हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे. त्यातून बेरोजगारी, बेकारी प्रचंड वाढत आहे. असे असताना मग मुलांनी काम कुठं मागायचं. लाखो कोटी रुपयांचं प्रकल्प गेल्याने रोजगार बुडाला आहे. राज्यातून गेलेल्या प्रकल्पावरून राजकीय व्यक्ती समर्थन करत असेल तर दुर्दैव आहे. प्रत्येक प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी सर्व राज्यकर्त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे आर्थिक सुबत्तता निर्माण होऊन तेथील भागात रोजगार निर्माण होतील," असे प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिले आहे.
गुजरातवरुन पंतप्रधानांवर टीका
"देशाच्या पंतप्रधानासाठी प्रत्येक राज्य समान असले पाहिजे. त्यांनी सर्व राज्यांकडे मुलासारखे पाहिले पाहिजे. मी गुजराती म्हणून गुजरातला प्राधान्य देता कामा नये," अशा शब्दात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.