Ajit Pawar on Sanjay Raut and Kharghar Death Case : राज्याच्या राजकारणात अजित पवार भाजपसोबत सरकार स्थापन करणार असे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मी राष्ट्रवादी सोडणार नाही, असे बॉन्डपेपरवर लिहून देऊ का, असा सवाल केला होता. आज त्यांनी पुन्हा एकदा भाष्य केले आहे. माझ्या बद्दल शंका कुशंका घेण्याचे कोणाला कारण नाही. माझा आजचा नियोजीत कार्यक्रम होता. त्यामुळे मी पुण्यात आहे. आजच्या बैठकीला त्यामुळे गैरहजर आहे. मी माझ्याबाबतीत सगळं काही स्पष्ट केलेलं आहे. माझ्या बाबतीत शंका कुशंका डोक्यातून काढा, असे अजितदादा म्हणाले. दरम्यान, यावेळी संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर त्यांना सवाल विचारण्यात आला. त्यावेळी अजित पवार म्हणाले, कोण संजय राऊत ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान,  अजित पवार आणि राऊतांमधला वाद अजूनही मिटण्याचे नाव घेत नाही. पत्रकारांनी राऊत यांच्याबद्दल अजित पवार यांनी प्रश्न विचारला असता, कोण संजय राऊत? असं उत्तर अजित पवार यांनी दिलं. मी कुणाचं नाव घेतलं नाही, कोणी का म्हणून अंगाला लावून घ्यावं? असं म्हणत मी माझा पक्षाबद्दल बोलल्याचं पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्यातील वाद संपणार का, याची उत्सुकता आहे. की या वादामुळे आघाडीत ठिणगी पडू शकते, अशी चर्चा आहे.


सहकारी बँकाबद्दल रिझर्व्ह बँकेकडून दूजाभाव


यावेळी अजित पवार यांनी केंद्रातील सरकारवर टीका केली. सहकारी बँकाबद्दल रिझर्व्ह बँकेकडून दूजाभाव केला जात आहे. खासगी तसेच राष्ट्रीयीकृत बँकाना मोकळीक दिली आहे. त्यांनी बड्या लोकांना दिलेली11 लाख 10 हजार कोटींची कर्जे माफ केली जातात. सहकारी बँकांना मात्र कठोर नियम लावले जातात. जरा काही घडलं की निर्बंध आणले जातात, असे अजितदादा म्हणाले.


शरद पवारांनी अदाणी यांची भेट घेतलेली नाही. तर अदाणी हे शरद पवार यांच्याकडे गेले असे मी वाचले. अदाणी यांच्यावरील आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत. त्यांची आधीपासून ओळख आहे. त्यामुळे त्यांनी भेटण्यात काही गैर वाटत नाही. मात्र, उदय सामंत त्यांना भेटायला गेले हे मला माहित नाही, असे अजित पवार म्हणाले. त्याचवेळी ते म्हणाले, मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका फेटाळल्या गेल्यानंतर सरकारने तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. सरकारने विधी आणि न्याय विभागाच्या तसेच संघटनांच्या प्रमुखांना विश्वासात घेऊन बैठक घ्यावी.


महाराष्ट्र भूषण कार्यक्रम, कोणाच्या हट्टासाठी हे केलं गेलं ?


 खारघरमध्ये जे घडलं घडलं त्याची जबाबदारी सरकारची आहे. कारण सरकारने कार्यक्रम आयोजित केला होता. खारघर दुर्घटनेत किती लोक मृत्युमुखी पडलेत याबाबत सरकारने दिलेल्या आकडेवारीत तफावत आहे. त्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मी राज्यपालांकडे केली आहे.  काही जण आकडा सांगून मोकळे झालेत.  मला आकडा सांगायचा नाही.  पण याची न्यायालयीन चौकशी घ्यायला हवी. काही व्हिडिओ आणि फोटो भयानक आहेत तर काही फोटोत चांदीच्या ताटात जेवताना दिसत आहे. यामध्ये आयएएस अधिकारी जबाबदार आहेत का ? कोणाच्या हट्टासाठी हे केलं गेलं ? आम्ही माहितीच्या अधिकारात महाराष्ट्र भुषण पुरस्कार कार्यक्रमासाठी किती खर्च आलाय याची आम्ही माहिती मागवली आहे.  आतापर्यंतच्या महाराष्ट्र भुषण कार्यक्रमात सगळ्यात जास्त खर्च या कार्यक्रमात झाला आहे. यामधे सत्य काय आहे हे समोर आलं पाहिजे. कोणीही अधिकारी असले तरी ते कोणाशी तरी संबंधित असतात, त्यामुळे न्यायालयीन चौकशीची गरज आहे, असे अजित पवार म्हणाले.