...तर मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो असतो; शरद पवारांचं नाव घेत छगन भुजबळांचा दावा
Chhagan Bhujbal Says I Could Have Been CM: तुरुंगामधून परतल्यानंतर शरद पवारांनी तुम्हालाच संधी दिल्याचा मुद्दा उपस्थित करत छगन भुजबळ यांना महिला पत्रकाराने प्रश्न विचारला असता त्यांनी यासंदर्भात सविस्तर उत्तर दिलं.
Chhagan Bhujbal Says I Could Have Been CM: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबरोबर मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपणच काँग्रेसचे मुख्यमंत्री झालो असतो असं विधान केलं आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवारांच्या (Sharad Pawar) भूमिकेसंदर्भात भुजबळ बोलत होते. तुरुंगामधून बाहेर आल्यानंतर शरद पवारांनी तुम्हाला पुन्हा संधी दिली असं असताना तुमच्यावर अत्याचार झालं असं तुम्ही कसं म्हणून शकता असा प्रश्न भुजबळ यांना विचारण्यात आला असता त्यांनी हे विधान केलं.
तुरुंगातून आल्यानंतर तुम्हाला मंत्री केलं, मग अन्याय कसा?
"तुम्ही काही काळ तुरुंगात घालवला. त्यावेळी भुजबळांना पुन्हा संधी देऊ नका असं शरपद पवारांना सागण्यात आलं होतं. मात्र मंत्रीपदाची यादी आली तेव्हा पहिलं नाव तुमचं होतं. मग तुम्ही कसं म्हणू शकता त्यांनी तुमच्यावर अन्याय केला," असा प्रश्न छगन भुजबळ यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना छगन भुजबळ यांनी, "कुठल्याही पक्षामध्ये माझ्यासारख्या माणसाला, ज्याला राजकारणातील वाडवडीलांचा राजकीय इतिहास नाही त्याला फार संघर्षातून पुढे यावं लागतं. शिवसेना निर्माण झाली तेव्हा पहिल्या दिवसापासून, जेव्हा नगरसेवक नव्हता, शाखाप्रमुखाची नेमणूक व्हायची होती. बाळासाहेबांनी हळहळू संधी दिली. आम्ही बाजूला झालो. पवारसाहेबांबरोबर राहिलो. पवारसाहेबांनी अनेकदा मान्य केलं मंडल आयोगाची अंमलबजावणी सुरु झाली. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं. त्याच्यानंतर काँग्रेस पक्ष जो 1995 मध्ये हरला. त्यावेळी विरोधीपक्ष नेता म्हणून कोणी काम केलं? कोणी लढाई लढली भाजपा-शिवसेना सरकारविरोधात? कोण लढलं? जिवावर हल्ला होईपर्यंत लढला छगन भुजबळ," असं उत्तर दिलं.
मीच मुख्यमंत्री झालो असतो पण...
पुढे बोलताना भुजबळ यांनी, "1999 ला निवडणूक झाल्यानंतर जर शरद पवार काँग्रेसमधून बाहेर निघाले नसते तर मीच मुख्यमंत्री झालो असतो काँग्रेसचा. मी काँग्रेस कार्यकारी समितीचा सदस्य होतो विधानमंडळाचा नेता म्हणून तशा प्रकारच्या ऑफर दिल्लीमधून येत होत्या. दिल्लीवरुन काँग्रेसचे नेते येत होते यासंदर्भात. त्यांना (शरद पवारांना) सांगितलेलं तुम्ही जाऊ नका. त्यात पायलट होते, माधवराव शिंदे होते. कलमाडी होते, ऑस्कर फर्नांडिस होते. शिला दिक्षित गेल्या. सोनिया गांधींच्या कार्यालयातील जॉर्ज यांनीही पवारसाहेबांना सांगितलं. हे ही त्यांना माहिती आहे. प्रांताध्यक्ष झाल्यानंतर मी काँग्रेसची ऑफर नाकारली. पक्षाची स्थापना सुद्धा झाली नव्हती तेव्हा मी त्यांच्याबरोबर आलो. पवारसाहेब एकीकडे आणि मी एकीकडे असं दोघं मिळून प्रचार केला पक्षाचा," असंही सांगितलं.
नक्की वाचा >> काका-पुतण्याचा संघर्ष पाहून शरद पवारांच्या पत्नीला अश्रू अनावर; कारमधील 'तो' फोटो चर्चेत
कागदपत्रांवर आधीच केल्यात सह्या
आम्ही सरकारमध्ये सामील व्हायच्या अगोदर यासंदर्भामधील कागदपत्रं, सह्या केलेल्या आहेत. अजितदादा पक्षाचे प्रमुख आहेत आणि यापुढे राहतील असं त्यात आम्ही नमूद केलेलं आहे. पक्षाची घटना, प्रचलित राजकीय पक्षासंदर्भातील निवडणुक आयुक्तांकडील नियम या सर्व गोष्टींची चर्चा करुन त्याची मांडणी आधीच केली आहे, अशी माहितीही छगन भुजबळ यांनी दिली.