साहित्य संमेलन महामंडळ अध्यक्ष श्रीपाद जोशींचा राजीनामा
यंदाचं अखिल भारतीय साहित्य संमेलन अवघ्या काही दिवसांवर आलेलं असतानाच संमेलनाचा नवा वाद काही दिवसांपूर्वीच समोर आला.
मुंबई : यंदाचं अखिल भारतीय साहित्य संमेलन अवघ्या काही दिवसांवर आलेलं असतानाच संमेलनाचा नवा वाद काही दिवसांपूर्वीच समोर आला. संमेलनाच्या उदघाटनावेळी प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांचे उद्घाटकपदाचे निमंत्रण ऐनवेळी रद्द केल्याने मराठी साहित्य संमेलनात वाद निर्माण झाला असतानाच साहित्य मंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
विदर्भ साहित्य संघाच्या ई-मेलवर राजीनामा पाठवून त्यांनी हा पदभार सोडण्याचा निर्णय घेतला. तसंच सहकार्याबद्दल साहित्य संघाचे आभारही मानले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित उद्घाटक नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्यानंतर डॉक्टर जोशी यांनी अनेकांची दिशाभूल केली शिवाय यवतमाळ येथील आयोजक संस्थेवर हे निमंत्रण रद्द करण्याबाबतचे खापर फोडले.
दरम्यान, डॉक्टर श्रीपाद जोशी यांनीच निमंत्रण रद्द करण्याची सूचना केली असा खुलासा संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉक्टर रमाकांत कोलते यांनी केला होता. त्यामुळे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर जोशी यांच्यावर चौफेर टीका होत होती. आता महामंडळाच्या उपाध्यक्ष असलेल्या विद्या देवधर यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे येण्याची शक्यता आहे.
आपल्या या निर्णयाविषयी अधिक माहिती देत, संबंधित प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारूनच मी राजीनामा दिल्याचं ते म्हणाले. 'हे संमेलन व्हावं हा माझा आणि सर्वांचा अग्रक्रम असल्याने आयोजकांच्या अडचणी समजून घेणं आवश्यक होतं, त्या अडचणी समजून घेऊन राजनीमा दिला पण आयोजकांनी देखील काय बोलतो, कोणाविषयी बोलतो याचं भान बाळगणं आवश्यक होतं, मुळात ज्याची चूकच नाही त्याला खलनायक ठरवून जाणिवपूर्वक हे कटकारस्थान रचण्यात येणं ही बाब अतिशय क्लेशदायक असून, नयनतारा सहगल आल्यानंतर हे संमेलन होणारच नाही अशी परिस्थिती निर्माण केली गेली', असा खुलासा त्यांनी केला.
या राजीनाम्यावर महामंडळाचा निर्णय काय?
नयनतारा सहगल यांचं आमंत्रण कोणामुळे रद्द झालं यावर न बोलता महामंडळाचा अध्यक्ष म्हणून त्याची नैतिक जबाबदारी घेत मी राजीनामा देत आहे, या कारणाचा श्रीपाद जोशी यांनी राजीनाम्यात उल्लेख केला. त्याचविषयी आता महामंडळात विचारविनिमय होणार असल्याचं कळत आहे. त्याविषयीच गुरुवारी महामंडळाची बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत जोशी यांच्या राजीनाम्यावर निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती महामंडळाच्या उपाध्यक्षा विद्या देवधर यांनी दिली. त्यामुळे आता महामंडळाच्या निर्णय़ाकडेच साहित्य विश्वाचं लक्ष लागलं आहे.