जयेश जगड, झी मीडिया, अकोला : एक मनोरुग्ण कोविडमधून बरा झाल्यानंतर बेपत्ता झाल्याने अकोल्यात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार एकदा पुन्हा समोर आलंय. आता याप्रकरणात भाजपने उडी घेतली असून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी मुख्यामंत्र्यांकडे केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकोल्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयातून कोविडचा उपचार घेऊन बरा झालेला एक रुग्ण गेल्या १५ ऑगस्टपासून बेपत्ता झाल्याची बाब समोर आली. ५१ वर्षीय अविनाश लोखंडे असं या बेपत्ता झालेल्या रुग्णाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार अविनाश लोखंडे हे मनोरुग्ण असून गेल्या पाच वर्षांपासून ते अकोला येथील केळकर सन्मित्र मानस आणि व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेत होते.


८ ऑगस्टला अविनाश कोरोनाग्रस्त झाल्याने त्यास शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या कोविड कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र १५ ऑगस्टला त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने दिलेल्या माहितीनुसार या रुग्णाला दिलेल्या पत्त्यानुसार मूर्तिजापूर येथील किर्ती नगरात सोडून देण्यात आलं.



मात्र २० दिवस उलटूनही अविनाश घरी पोहचले नसल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय. यामुळे राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मनोरुग्ण असलेल्या कोविडग्रस्त अविनाश लोखंडे बेपत्ता झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यास न्याय देण्याबाबतची मागणी केली आहे. तर अविनाशचा घातपात झाल्याची शंका भाजपचे प्रवक्ते शिवराज कुलकर्णी यांनी उपस्थित केली आहे. 


या प्रकरणात कमालीची गुंतागुंत झाली आहे, आठ दिवस उपचारानंतर त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. यानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली मात्र दिलेल्या पत्त्यावर रुग्णाला पोहचविल्याचं सामान्य रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे. सोबतच ज्या खासगी रुग्णालयाने अविनाशला उपचारासाठी भरती केलं त्यांनी स्वतःचा पत्ता न देता मुर्तिजापूरचा पत्ता दिल्याने हा सर्व गोंधळ उडाला असल्याचं रुग्णालय प्रशासन म्हणतंय.


गेल्या पाच वर्षांपासून अविनाश यांचा उपचार अकोल्यातील केळकर सन्मित्र मानस व व्यसनमुक्ती केंद्रात सुरु होते. डॉ.केळकर यांनी चुकीचा पत्ता दिल्यामुळे हा गोंधळ उडाल्याचं जिल्हा रुग्णालयाने म्हंटलंय. मात्र रुग्णाला कोविडच्या उपचारासाठी सामान्य रुग्णालयात भरती करण्याआधी केळकर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याचं डॉ. खेळकर यांनी म्हंटलंय. सोबतच पत्ता चुकीचा न दिल्याचंही स्पष्टीकरण डॉ. दीपक केळकर यांनी दिलंय. 


अविनाश लोखंडे खरोखरच बेपत्ता आहे की खरंच त्याच्या जीविताचे बरे वाईट झाले आहे ? मूळचा अमरावती येथील रहिवासी असून त्यांना मुर्तिजापूरला का सोडण्यात आलं ? प्रकरण झाकण्यासाठी मूर्तिजापूरची संबंध काल्पनिक कथा तयार केली आहे काय ? रुग्णाला घरी पोहचवला नंतर त्यांच्या नातेवाईकांची साक्षरी घेण्यात येते ती घेण्यात आली आहे काय ? रुग्ण बेपत्ता झाल्याने यंत्रणा एकमेकांवर तर खापर फोडत नाही ? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत.


या गुंतागुंतीच्या प्रकरणात डॉ.केळकर, अकोला जीएमसी आणि जिल्हा शल्य चिकित्सक अशा तीन यंत्रणा पैकी कुणीतरी एक जबाबदार असल्याचे चित्र आहे.