जयेश जगड, झी मीडिया, अकोला : सामाजिक एकोपा जपण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. मात्र अकोल्यातील (Akola) संकल्प ढोल पथकानेही (Sankalp Dhol tasha pathak) सामाजिक एकोपा जपत समाजाप्रति दायित्व सुद्धा पार पाडलं आहे. दरवर्षी या पथकाच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशातून वंचित आणि गरजूंना मदत केली जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकोला जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात धार्मिक व सांस्कृतिक सेवा कार्यक्रमात एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या व सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांची माहिती घेऊन त्यांना सहकार्य व्हावे या उद्देशाने 8 वर्षांपूर्वी संकल्प प्रतिष्ठान, पारंपरिक ढोल ताशा पथकाची स्थापना करण्यात आली होती.


कशी झाली सुरुवात...


वंचित आणि होतकरू कर्तव्यदक्ष व्यक्तींना गणेशउत्सवाच्या माध्यमातून मदत व्हावी यासाठी सुरवातीला 7 वादक विद्यार्थी मित्रांपासून सुरु झालेलं हे ढोल पथक आज 125 सदस्यांपर्यंत पोहचलं आहे. या पथकात 10 वर्षांपासून ते 70 वर्षे वय असणाऱ्या  शहरातील नामवंत अभियंते, व्यावसायिक, अधिकारी, गृहिणी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, युवक, युवती वादकांचं समावेश आहे.


संकल्प ढोल पथकाचा मूळ उद्देश भारतीय संस्कृती जोपासण्यासोबत समाजात सक्रियतेने निस्वार्थ कार्य करणाऱ्या व कुठल्याही अनुदाना शिवाय सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना आर्थिक सहाय्य करणे हा सुद्धा आहे.


संकल्प प्रतिष्ठान हे पथक दरवर्षी एका गरजू संस्थेसाठी संकल्प घेऊन गणेश मंडळासमोर ढोल वादन करून रक्कम जमा करतात. यातून जमा झालेली रक्कम त्या संस्थेला दिली जाते. या ढोल पथकातील कुठलाही वादक मानधन घेत नाही तर सेवेच्या दृष्टीने वादन करतात.


अकोला जिल्ह्यातील गाडगेबाबा आपातकालीन बचाव पथक कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली तर आपल्या जीवाची पर्वा न करता तत्काळ मदतीसाठी धाव घेतात यासाठी संकल्पने यंदा यांची निवड केली आहे. बचाव पथकाला ड्रोन कॅमेरा, स्कुबा डायविंग किट, रेस्क्यु बोट व जनरेटरची आदी साहित्याची गरज असून त्याची किंमत अंदाजे 11 लाख रुपये आहे. त्यासाठी संकल्प प्रतिष्ठानने यंदा मोठ्या प्रमाणात वादन करून जमा झालेला निधी गाडगेबाबा आपातकालीन बचाव पथकाला देणाचा निर्णय घेतला आहे.


दरम्यान, आतापर्यंत संकल्प प्रतिष्ठानने कस्तुरी चॅरिटेबल ट्रस्ट, गायगाव यांना वृद्धाश्रम बालकाश्रमसाठी, मिशन दिलासा, नाम फाउंडेशन, गायत्री  बालिकाश्रम, डॉ. हेडगेवार रक्तपेढी यांना थॅलेसिमिया रुग्णांसाठी, डॉ. हेडगेवार रुग्णालय व अनुसंधान प्रकल्प, अकोला यांना डायलिसिससाठी मदत केली आहे.