अकोले : इच्छाशक्ती आणि कठोर मेहनत करण्याची तयारी असेल तर अशक्य गोष्टही शक्य करता येते, हेच दाखवून दिलंय दीपक जावारे या तरुणाने. चणे शेंगदाणे विकून दीपकने शिक्षण घेत रेल्वेत अधिकाऱ्याची नोकरी मिळवली. त्याच्या या कामगिरीचं जिल्ह्यात कौतुक होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विदर्भातून उपजिविकेसाठी अकोल्यात
जावारे कुटुंब हे मुळचं विदर्भातलं. साधारण वीस वर्षांपूर्वी उपजिविकेच्या शोधात हे कुटुंब अकोले शहरात आलं. अकोले शहराच्या बाजार ताळ परिसरात त्यांनी हातगाडीवर चणे-शेंगदाणे विकायरला सुरुवात केली. वडील चणे-शेंगदाणे भाजायचे तर दीपक गाडीवर विक्रीसाठी बसायचा. पण याचा परिणाम त्याने आपल्या शिक्षणावर होऊ दिला नाही. रस्त्यावरच्या लाईटमध्ये त्याने अभ्यास सुरु ठेवला.


आर्थिक परस्थितीच्या नावाने तो कधीच रडत बसला नाही. की कधी मोर्चा, रॅलीत सहभागी झाला नाही. आपल्या ध्येयाच्या दिशेने त्याने आपली वाटचाल सुर ठेवली.


पहिल्या प्रयत्नात आलं अपयश
घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने त्याने लहान वयात एका कंपनीत नोकरी सुरु केली. पण त्याचं ध्येय मोठं होतं, त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला. अशातच त्याला रेल्वे भरती परीक्षेबाबत माहिती मिळाली. दोन वर्षांपूर्वी त्याने रेल्वेची परीक्षा दिली, पण पहिल्या प्रयत्नात त्याला अवघ्या दोन गुणांनी अपयश आलं. 


पण दीपक हरला नाहीत्याने नव्या जोमाने, नव्या उमेदीने पुन्हा प्रयत्न करण्याचा निश्चय केला आणि त्यादृष्टीने त्याने प्रयत्न सुरु केले. यावेळी मात्र त्याच्या प्रयत्नांना आणि त्याच्या मेहनतीला यश आलं. रेल्वे भरती परीक्षेत तो उत्तीर्ण झाला आणि त्याची नोकरी पक्की झाली.


दीपकच्या या यशाचं कौतुक संपूर्ण जिल्हाभरात झालं. लोकप्रतिनिधींसह अकोलेकरांनी दीपकचा सत्कार केला. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर दीपकने मिळवलेलं हे यश युवा पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.