मुंबई : आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारी अक्षय्य तृतीया साजरी होतेय. अक्षय्य तृतीया म्हटलं की दोन गोष्टी आवर्जून आठवतात, एक म्हणजे धातूंचा राजा सोनं आणि दुसरा फळांचा राजा आंबा. या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची जुनी परंपरा आहे आणि आंबा खायला सुरू करायची असते ती याच दिवशी... अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सराफा बाजार आणि फळ बाजारात गर्दी असते. तर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आलीय. काल म्हणजे सोमवारीच आकाशात चंद्र दिसलाय त्यामुळे आजपासून पवित्र रमजानच्या महिन्यालाही सुरुवात झालीय. रमजानच्या या पवित्र महिन्यात मुस्लीम बांधव ३० दिवस रोजा पकडतात.


सिद्धिविनायक मंदिरात गर्दी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साडे तीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा अक्षय्य तृतीया आणि मंगळवार एकाच दिवशी आलाय. त्यामुळे मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केलेली दिसतेय. आज दिवसभरात दीड लाखाच्यावर भक्त येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे भाविकांना गणपती दर्शनासाठी मंदिर पहाटे सव्वा तीन वाजता खुलं करण्यात आलं असून रात्री बारा वाजेपर्यंत खुलं रहाणार आहे. अक्षयतृतीयेच्या निमित्तानं मंदिराला आकर्षक सजावटही करण्यात आलेली आहे.


बाप्पाला आंब्यांचा नैवेद्य


पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये आज ११ हजार आंब्याचा नैवेद्य दाखविण्यात आला. साडे तीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त मानल्या जाणाऱ्या या दिवशी फळांचा राजा अंब्याला विशेष महत्त्व असतं... आणि म्हणूनच अक्षय्य तृतीयेला बाप्पाला आंब्याचा नैवेद्य दाखविण्याची परंपरा आहे. या मुहूर्तावर बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि आरास पाहण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली आहे. गेल्या दहा वर्षांहून अधिक वर्षे ही परंपरा कायम आहे.


दगडूशेठ हलवाई मंदिर

सोनं खरेदीचा मुहूर्त


अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची जुनी परंपरा आहे.  त्यामुळे आज सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी आहे. या दिवसांत आंब्यांचे भावही कमी होतात त्यामुळे आंबा खरेदीही वाढते.



विठ्ठल्लाला फुलांची आरास 


अक्षय्य तृतीयेनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरात श्री पांडुरंगाला फुलांची आकर्षक आरास करण्यात आलीय. विठूरायाचा आणि रूक्मिणी मातेचा गाभारा, सभामंडप, मंदिरातले खांब या सर्व ठिकाणी झेंडूच्या फुलांच्या माळांची सजावट करण्यात आलीय. पहाटे काकड आरती झाल्यावर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.


रमझानलाही सुरुवात


मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमझान सणाला सुरूवात झालीय. काल रात्री रमझानचं पवित्र चंद्रदर्शन झालं. त्यामुळे आजपासून रोजा या उपवासाला सुरूवात झालीय. रोजे पाळणं हे अल्लाने दिलेलं कर्तव्य आहे अशी भावना मुस्लीम धर्मियांची असते. यावर्षी ऐन उन्हाळ्यात रमझान सण आल्यामुळे रोजा हा उपवास दर दिवशी तब्बल १५ तास असण्याची शक्यता आहे. सूर्योदय ते सूर्यास्त या दरम्यान हे रोजे ठेवले जातात. अर्थात गेल्यावर्षीच्या तुलनेत १४ मिनिटं रोजे कमी असतील पण उन्हाळा ऐन भरात असल्याने निर्जळी उपवास करणाऱ्यांसाठी आव्हान आहे. रमझान निमित्त रोजे सोडणाऱ्यांसाठी रात्री मोहम्मद अली रोडवर विविध प्रकारची फळं, मांसाहारी पदार्थ, मिठाई यांची रेलचेल असते. मुस्लीम धर्मियांव्यतिरिक्त अन्य समाजही इथल्या सुंदर पदार्थांचा आस्वाद घेतात.