अलिबाग : Coronavirus  कोरोना व्हायरसचं थैमान सुरु झाल्याच्ं लक्षात येताच अनेकांनी आपल्या गावची वाट धरली. एरव्ही हसतमुखाने जो गाव स्वागतासाठी सज्ज असायचा त्याच गावाने यावेळी मात्र या शहरवासियांना वेगळं रुप दाखवलं. फक्त एकाच नाही, तर अशा अनेक गावांमध्ये हेच चित्र पाहायला मिळालं. पण, ते म्हणतात ना अनेकदा अपवाद डोळे उघडण्याचं काम करतात; अगदी तसंच काहीसं चित्र रायगड जिल्ह्यातील चौल या गावात पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भवाची एकंदर पार्श्वभूमी पाहता अनेक गावांमध्ये शहरांतून येणाऱ्यांना क्वारंटाईन केलं जात आहे. चौलमध्येही हाच पाढा गिरवला जात आहे. पण, हा पाढा गिरवला जात असताना कुठेही टोचणारे शब्द किंवा विचित्र वागणूक दिली जात नाही. 


मुंबई, पुण्याहून येणाऱ्या शहरातील नागरिकांचं या गावामध्ये मनापासून स्वागत करण्यात येत आहे. चौलच्या शाळांमध्ये शहरांतून आलेल्या गावकऱ्यांसाठी क्वारंटाईन सेंटर सुरु करण्यात आले आहेत. बरं, इतकंच नव्हे तर या ठिकाणी क्वारंटाईन असणाऱ्यांना इथे आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्यात येत आहेत. 


चौलमध्ये येणाऱ्या जवळपास १७२ जणांनी क्वारंटाईन सुविधेचा लाभ घेतला आहे. तर, ११२ जण क्वारंटाईनचा काळ संपवून आपआपल्या घरीही गेले आहेत. तुम्ही गावात या, पण शासनाने दिलेले सर्व नियम पाळा असं आवाहन गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे आणि अर्थातच शहरवासियांकडून त्याचा सहज स्वीकारही केला जात आहे. 



कंधों से मिलते है कंधे! पोलिसांसाठी लष्कराच्या जवानांनी पाठवली खास भेट


क्वारंटाईन सुविधांविषयीसुद्धा एकिकडे तक्रारीचा सूर आळवला जात असतानाच चौलमध्ये क्वारंटाईन असणारी मंडळी मात्र या उलट प्रतिक्रिया देत आहेत. स्वतंत्र खोल्या, शौचालयं, पिण्याच्या पाण्याची सोय, सॅनिटायझर अशा सोयींसह इथे गावकऱ्यांकडून शहरवासियांची आपलेपणानं विचारपूसही केली जात आहे. त्यामुळे चौल गावाने क्वारंटाईनच्या काळात खऱ्या अर्थाने शहरवासियांना हीन वागणूक देणाऱ्या इतर गावांपुढे एक प्रकारचा आदर्शच प्रस्थापित केला आहे, असं म्हणायला हरकत नाही.