नितेश महाजन, विशाल करोळे, औरंगाबाद : रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्या मनोमिलनासाठी सुभाष देशमुख यांनी प्रयत्न केला. या दोघांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी थेट सुभाष देशमुख यांनाच पाठवलं. मग लगेचच दानवे आणि खोतकर यांचं मनोमिलन झाल्याचं जाहीरही करण्यात आलं. यानंतर भाजपचे मंत्री सुभाष देशमुख आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी एकमेकांना मिठी मारली. अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात गेली दोन वर्षं सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही मिठी बरच काही सांगणारी आहे.


पण या मनोमिलनाला वेगळं वळण मिळालं ते खोतकरांकडून. ते मनोमिलनाबद्दल काहीच बोलायला तयार नाहीत. त्यांच्यासाठी उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम आहे. खोतकर यांना हा विषय मातोश्री दरबारी नेऊनच सोडवायचाय, असं दिसत आहे. म्हणजे माघार घेतली ती दानवे किंवा मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन नव्हे, तर फक्त उद्धव यांच्या सांगण्यावरुनच, असंही खोतकर यांना दाखवून पक्षात आणि स्थानिक राजकारणात फायदा पदरात पाडून घ्यायचा असेल.