`या` जिल्ह्यात पोळा सणाला बंदी घालण्याचा प्रशासनाचा निर्णय
शेतशिवारातच पोळा साजरा करा असे आवाहन
अमरावती : पोळा हा आपल्या कृषीप्रधान देशातील व मराठी संस्कृतीतील महत्वाचा सण आहे. मात्र कोरोना वाढतंच असल्याने दक्षता म्हणून सार्वजनिक सुरक्षितता जपण्यासाठी शेतकरी बांधवांनी, सामूहिक पूजन न करता घरी, शेतशिवारातच पोळा साजरा करा असे आवाहन अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
शेतकऱ्याला पीक चांगल यावं यासाठी बैल दिवसभर शेतात राबत असतात. शेतकरी आणि बैलांचं भावनिक नातं तयार झालेलं असतं. त्यामुळे बैलपोळ्याच्या दिवशी शेतकरी बैलप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करत असतो. बैलाला बाशिंगापासून सजवून खायला देत त्याच्यावर प्रेम व्यक्त करत असतो. या दिवशी शेतकरी मोठ्या प्रमाणात बाहेर येऊन बैलाची मिरवणूक काढत असतात. पण आता कोरोनामुळे यावरही संकट ओढवलंय.
अमरावती जिल्हात पोळा सणाला देखील बंदी घातल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. तसेच पोळ्याला मारबत मिरवणूक व बैल पोळा भरवण्यास परवानगी नाही असेही प्रशासनाचे वतीने सांगण्यात येत आहे.
त्यामुळे सामूहिक पूजन न करता घरी, शेतशिवारातच पोळा साजरा करण्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आवाहन केले आहे. तसेच यात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणा-यांविरुद्ध गुन्हे दाखल होणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.