शेतमजूरीच्या पैशातून कोट्यवधींचा मसाला उद्योग उभारणाऱ्या मराठमोळ्या उद्योजिकेचं निधन
Kamalatai Pardeshi Death : शेतमजुरी करणारी महिला कोट्यवधींचा उलाढाल करणारा उद्योग उभारु शकते याचं मूर्तीमंत उदाहरण ठरलेल्या या महिलेने आपल्या झोपडीतून सुरु केलेला उद्योग आता कोट्यवधींची उलाढाल असलेला उद्योग झाला आहे.
Kamala Pardeshi Death: एमडीएच, एव्हरेट आणि मजेठियासारख्या भारतामध्ये प्रसिद्ध असलेल्या मसाल्यांच्या स्पर्धेत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अंबिका मसालेच्या सर्वेसर्वा असलेल्या कमल परदेशी यांचं निधन झालं आहे. स्वत: निरक्षर असूनही महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी अंबिका उद्योग समूह उभारला. अंबिका मसाल्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेल्या कमला यांच्यावर मागील काही काळापासून पुण्यात उपचार सुरु होता. कमल यांना ब्लड कॅन्सर झाला होता. पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 63 वर्षांच्या होत्या. दौंड तालुक्यातील खुटबाव गावात त्यांच्यावर अत्यंस्स्कार केले जाणार आहेत.
शेतमजूर ते उद्योजिका
शेतमजुरी करणारी महिला कोट्यवधींचा उलाढाल करणारा उद्योग उभारु शकते याचं मूर्तीमंत उदाहरण ठरलेल्या कमला यांचा प्रवास थक्क करणार आहे. 2000 साली खुरपणीच्या माध्यमातून मिळालेल्या रोजंदारीच्या पैशांच्या आधारावर व्यवसाय सुरु करणाऱ्या कमला यांनी त्यांच्या मसाल्याच्या उद्योगाची सुरुवात झोपडीमधूनच केली. सध्या त्यांची अंबिका मसाले कंपनी जगभरातील अनेक देशांमध्ये प्रसिद्ध आहे.
जर्मनीपर्यंत पोहोचले अंबिका मसाले
सुरुवातीला कमला यांनी पुण्यातील सरकारी कार्यालयाबाहेर मसाल्यांची विक्री केली. लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी मुंबईतील ग्राहकपेठा आणि प्रदर्शनांमधून मसाला विक्री सुरु केली. हळूहळू बिग बाझारमध्ये त्यांचे मसाले विकले जाऊ लागले. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. जर्मनच्या माजी चॅन्सलर अँजेला मार्केल यांनीही कमला यांच्या कामाचं कौतुक केलं होतं. मुंबईमध्ये नाबार्ड बँकेच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात मार्केल आणि कमला यांची भेट झाली होती. आम्हाला बाजारपेठ उपलब्ध करुन द्या या कमला यांच्या मागणीनंतर खरोखर काही आठवड्यांमध्येच अँजेला मार्केल यांच्या पुढाकाराने जर्मनीमध्ये अंबिका मसाल्यांच्या विक्रीला परवानगी मिळाली आणि विक्री सुरुही झाली.
अजित पवार म्हणतात, ग्रामीण भागातील महिलांचा आधारवड कोसळला
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कमला यांना श्रद्धांजली वाहिली आहे. "अंबिका मसाले उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रातील महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्या उद्योजिका कमलताई परदेशी यांच्या निधनानं ग्रामीण भागातील महिलांचा आधारवड कोसळला आहे. लोणची, चटणी आणि विविध प्रकारच्या मसाल्यांच्या व्यवसायातून ग्रामीण महाराष्ट्राच्या मसाल्यांची अस्सल चव कमलताईंनी जगभर पोहोचवली. अंबिका मसाले उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील हजारो महिलांच्या हाताला रोजगार देण्याचं, त्यांना आत्मनिर्भर करण्याचं काम त्यांनी केलं. शेतमजूर ते उद्योजिका असा कमलताईंचा प्रवास थक्क करणारा आहे. आपल्या उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राचं नाव जगाच्या नकाशावर ठळक केलं. त्यांच्या निधनानं मराठी उद्योग जगतातील प्रयोगशील व्यक्तिमत्त्व हरपलं आहे. परदेशी कुटुंबियांसह अंबिका परिवाराच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. कमलताई परदेशी यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो," असं अजित पवार यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरुन केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
साधेपणा चर्चेत
कमला यांच्या साधेपणा सर्वांना भावणारा होता. त्यांनी गावातील अनेक महिलांना पक्की घरं बांधून दिली. मात्र त्या स्वत: अगदी साध्या घरात राहत होत्या. त्या रोज घरापासून फॅक्टरीपर्यंत चालतच ये-जा करायच्या.